त्रिवृक्षसंगम दत्तमंदिराच्या वतीने महिलांचा भव्य स्नेहमेळावा मोशी प्राधिकरणात संपन्न

0
182

पिंपरी,दि. १६ (पीसीबी) – त्रिवृक्षसंगम दत्तमंदिराच्या वतीने मोशी प्राधिकरण परिसरातील महिलांसाठी बुधवार, दिनांक १५ मार्च २०२३ रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सात या कालावधीत भव्य महिला स्नेहमेळाव्यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, लघुनाटिका, मोफत आरोग्य तपासणी, महाआरती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, वनिता आल्हाट, भोसरी-चऱ्होली महिला मोर्चा अध्यक्ष गीता महेंद्रू, सामाजिक कार्यकर्त्या पूजा बोऱ्हाडे, उद्योजिका राजश्री गागरे, शालेय शिक्षण अधिकारी नीता खाडे, मुख्याध्यापिका विजया चौगुले; तसेच त्रिवृक्षसंगम दत्तसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कर्डिले, सचिव दीपक नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रगीताने स्नेहमेळाव्याचा प्रारंभ करून शिवगर्जना घेण्यात आली.

‘आधुनिक नारी’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत नारीशक्तीचे रूपांतर उद्योगशक्तीत करून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे विचार सहभागी महिलांनी व्यक्त केले. ‘नारी तू नारायणी’ या लघुनाट्याच्या माध्यमातून ऐतिहासिक काळातील प्रसंगात नारी जेव्हा सर्व सामर्थ्यानिशी एखाद्या क्षेत्रात उतरते तेव्हा ती पुरुषांपेक्षा श्रेष्ठ ठरते, हे प्रभावीपणे मांडण्यात आले. क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, शारीरिक बलप्रदर्शन, लिंबू चमचा, संगीतखुर्ची अशा स्पर्धांमध्ये सर्व वयोगटातील महिलांनी हिरीरीने भाग घेतला. त्यानंतर सेवाधर्म हॉस्पिटलच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचा लाभ बहुसंख्य महिलांनी घेतला. समारोप प्रसंगी त्रिवृक्षसंगम दत्तसेवा प्रतिष्ठानने नारीशक्तीला सन्मानित करण्यासाठी महिलांना श्री गुरुदत्ताच्या महाआरतीचा मान दिला. त्यानंतर अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

सुमारे दोनशेहून अधिक महिलांची उपस्थिती, विविध स्पर्धा अन् सांस्कृतिक कार्यक्रमातील आत्मविश्वासपूर्ण सहभाग, शिस्तबद्ध नियोजन यामुळे संपूर्ण स्नेहमेळावा अतिशय यशस्वी झाला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव दीपक नाईक यांनी प्रास्ताविकातून, “स्त्रीला तिच्यातील सुप्तशक्तीची जाणीव नसल्याने ती कुटुंबात अन् समाजात दुय्यम स्थान स्वीकारते; परंतु तिची अवस्था कस्तुरीमृगासारखी असते म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने भावी काळातही असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील!” अशी माहिती दिली. स्नेहमेळाव्याच्या संयोजनात संग्रामसिंह पाटील, जालिंदर खिलारी, पुरुषोत्तम बढे, धीरज नेहते, पांडुरंग खर्चे, अशोक धुमाळ, मीनाक्षी हांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.