त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ अभियान !

0
189

पुणे जिल्ह्यात शेकडो धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

पुणे, दि. १० (पीसीबी) – त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने देवालय, घरोघरी, नदीघाटावर दीपोत्सव साजरा करण्याची हिंदूंची परंपरा आहे. याच परंपरेतील एक भाग म्हणून भारत हिंदु राष्ट्र व्हावे, छत्रपती शिवाजी महाराज-रामराज्य यांप्रमाणे प्रत्येक हिंदूचे जीवन आदर्श असावे, यासाठी ७ नोव्हेंबर या दिवशी असणार्‍या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी घरोघरी दीप लावण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले होते.

या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील हिंदूंनी, ‘प्रभु श्रीरामचंद्रांचे ‘रामराज्य’ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ यांप्रमाणे आपले जीवन आदर्श होऊन, राष्ट्र व धर्मावरील सर्व संकटे दूर होऊन आदर्श हिंदू राष्ट्राची स्थापना होवो’ अशी प्रार्थना करत आपापल्या घरासमोर दीप लावले. या अभियानात धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. केडगाव, सासवड, कोलवडी, हडपसर, थेऊर यांसह शेकडो महिला-पुरुषांनी यात सहभाग घेतला. विविध ठिकाणी मंदिरात हिंदुराष्ट्रासाठी एक दीप असे अनेक दीप लावण्यात आले. काही ठिकाणी हिंदूंच्या संपूर्ण कुटुंबाने यात सहभाग घेतला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, आचार्य अत्रे मंडळ सासवड, श्री संगमेश्वर मंदिर समिती सासवड,राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट, हडपसर,विठ्ठल मंदिर उत्सव मंडळ, थेऊर इत्यादी संघटना या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या होत्या.

केडगाव येथील ‘स्वा. सावरकर युवा मंच’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी सांगितले की, हिंदुराष्ट्राचा हा दीप घरोघरी लावायला हवा. एकटा हिंदु म्हणून मी हिंदुराष्ट्रासाठी काय करणार? असा विचार न करता हा एक दीप म्हणजे हिंदुराष्ट्र स्थापन व्हावे यांसाठी केलेली कृतीमय प्रार्थनाच आहे असा भाव ठेवल्यास हिंदु राष्ट्राची पहाट नक्कीच उगवेल !
हिंदु राष्ट्र स्थापनेचा दीप अधिकाधिक हिंदूंमध्ये प्रज्वलित झाल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही !