‘त्या’ बेपत्ता दोन बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश

0
239

देहुगाव परिसरातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत 24 तासाच्या आत दोन्ही मुलांना पुणे रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. मात्र देहू गावातून दोन्ही मुले पुणे रेल्वे स्थानकात कशी पोहोचली, याबाबत चौकशी केली असता आश्चर्यकारक माहिती समोर आली. दोन्ही मुलांना आळंदी पाहण्याची इच्छा झाल्याने त्यांनी आई वडील घरी नसताना घर सोडले आणि त्यानंतर पुणे फिरण्यासाठी ते आळंदीहून पुणे रेल्वे स्थानकावर आल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वय वर्ष अनुक्रमे सहा आणि आठ वर्षाची दोन मुले देहूगाव मधून बेपत्ता झाल्याची तक्रार मुलांच्या पालकांनी देहूरोड पोलीस ठाण्यात दिली. अचानक दोन मुले बेपत्ता झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू केला. तात्काळ देहूरोड पोलिसांनी विविध पथके तयार करून दोन्ही मुलांच्या शोध कामासाठी रवाना केली. पोलिसांनी शहर परिसरातील बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, मंदिरे धुंडाळून काढली.

देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी एक पथक पुणे रेल्वे स्थानकावर पाठवले. या पथकाला माहिती मिळाली की, साथी फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी दोन मुलांना पुणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. साथी फाउंडेशनकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात असलेली मुले देहूगाव येथून बेपत्ता झालेली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी साथी फाउंडेशन कडून मुलांना ताब्यात घेते त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

म्हणून मुलांनी सोडले घर

बेपत्ता झालेली दोन्ही मुले देहूगाव येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात गंध लावण्याचे काम करतात. त्यांच्या एका मित्राने त्यांना सांगितले की, आळंदी येथे देखील गंध लावण्याचे काम केले जाते. त्यामुळे दोन्ही मुलांच्या मनात आळंदी बद्दलची कुतूहलता वाढली. दोघांनी ठरवून एके दिवशी आई वडील कामाला गेल्यानंतर घर सोडले. दोन्ही मुले देहू गावातून आळंदी येथे आली. आळंदी मध्ये त्यांनी काही वेळ घालवला. त्यानंतर दोघांनीही पुणे शहर बघायचे ठरवले. त्यामुळे दोन्ही मुले आळंदीहून थेट पुणे येथे आली. पुणे स्टेशन परिसरात आल्यानंतर दोघांची हालचाल नवखी आणि संशयास्पद वाटल्याने साथी फाउंडेशनने दोघांना ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्न गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, योगेश गायकवाड, उपनिरीक्षक वैभव पाटील, संदीप बोरकर, पोलीस अंमलदार सामील प्रकाश, शेजाळ, कानगुडे, माने, भिसे, बावनकर यांच्या पथकाने केली.