‘त्या’ नेत्याने द्यायला लावला शस्त्रपरवाना; रामदास कदमांचा नवा बॉम्ब

0
36

दि . १० ( पीसीबी ) – कुख्यात गुंड सचिन घायवळला शस्त्रपरवाना दिल्यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत सापडले आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दरम्यान, हा परवाना नियमानुसारच दिल्याचा दावा योगेश कदम यांनी केला आहे. तसेच, परवाना दिल्या त्यावेळी त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अशातच, योगेश कदम यांच्या वडील माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे घायवळ शस्त्रपरवाना प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

रामदास कदम यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला. विधिमंडळात एका मोठ्या पदावर बसलेल्या, विधिमंडळात मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या व्यक्तीने योगेश कदम यांना सांगितले. तो व्यक्तीही न्यायाधीश आहे. म्हणून योगेश कदमने शस्त्रपरवाना देण्याचा निर्णय घेतला. त्या व्यक्तीचे नाव मला घ्यायचे नाही. योगेश कदमने त्या व्यक्तीचे नाव मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ती व्यक्ती उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर, त्यांनी शिफारस केल्यानंतर राज्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, असे रामदास कदम यांनी सांगितले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. नेमका तो नेता कोणा? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे. अशापध्दतीने राज्यमंत्र्यांना आदेश देणे, चुकीचे आहे. राज्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, म्हणून मी मुख्यमंत्र्यांना कळवणार आहे. हा निर्णय माझ्या मुलाने घेतला आहे. त्यामुळे मी नाव घेणार नाही. योगेश कदमच सांगतील. हा विषय त्यांचा आहे. याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांना नाव कळवले आहे. अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावे आणि नाव जाणून घ्यावे, असे रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम यांच्या या प्रतिक्रियेनंतर सचिन घायवळ याला शस्र परवाना देण्यासाठी कदम यांच्यावर कोणाचा दबाव ? असा सवाल ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. रामदास कदम मोघम बोलू नका. हिम्मत असेल तर योगेश कदम यांना कोणी आदेश दिले त्याचे थेट नाव घ्या… गृहमंत्री योगेश कदम यांना सचिन घायवळ याला पासपोर्ट देण्यासाठी कोणी शिफारस केली होती का ? तुम्ही कोणाच्याही शिफारसीवरुन परवाना देत असाल तर तुम्हाला गुळाचा गणपती म्हणून या पदावर बसवले आहे का? ज्याने शिफारस केली होती त्याचे नाव घेण्याची तुमची हिंमत होत नाही म्हणजे तुम्हाला अजिबात प्रोटेक्शन नाही का ? तुम्हाला सतत भीती वाटतेय का ? तुम्ही त्यांची नावे सुद्धा घेऊ शकत नसाल तर बाळासाहेब यांचे नाव आणि त्याचा वारसा कसा काय सांगताय ? तुम्ही त्याचे नाव घ्या घाबरू नका असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे