महिन्याभरात दुसरी घटना; टँकर पलटी
पिंपरी,दि.२९(पीसीबी) – निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल व कै मधुकर पवळे उड्डाणपूलाच्या मध्यभागी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यामातून भुयारी मार्गाचे काम सुरू असून ठेकेदाराला दिलेल्या कामाची मुदत संपलेली असताना गेल्या महिन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी सदर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून मुदतवाढ दिली होती. या बाबीचा निषेध नोंदवत ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती.
गेल्या महिन्यात याच ठिकाणी केमिकल गॅस टँकर पलटी होऊन मोठा अपघात घडला होता. महापालिका पोलिस प्रशासन व अग्नीशमन दलाच्या जवान तसेच तज्ञांनी अथक परिश्रमातून मोठा अनर्थ टाळला होता. त्यातच काल पुन्हा टँकर पलटी होण्याची दुसरी घटना याठिकाणी घडली आहे.
रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचा कामाला विलंब होत असल्याने दोन्ही पुला दरम्यान रस्तात अडथळा निर्माण झाला असल्याने नागरिकांना एक ते दीड किलोमीटर वळसा घालावा लागत आहे. नागरिक रस्तावर उद्या मारून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत आहे. त्यामुळे येत्या काळात जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणूनच याठिकाणी ट्राफिक वार्डन व तात्पुरत्या सिग्नलची निर्मिती करून, धोकादायक गतिरोधकांची उंची कमी करत आवश्यक त्या उपाययोजना करून नागरिकांच्या जिवाशी चालवलेला खेळ तात्काळ थांबवण्यात यावा व भुयारी मार्गाचा कामाचा कालावधी पूर्ण होऊनही काम पूर्ण न करणार्या ठेकेदारावर कठोर कायदेशीर फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महानगर पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.