आकुर्डी, दि. २५ (पीसीबी) – राज्यात काय चाललंय हे जनता बघत आहे. कोण कोणाला चिठ्ठ्या देतयं, कोण माईक ओढून घेतंय हे सर्व जनतेला दिसत आहे. शिवसेनेत बंडखोरी करणा-यांना आगामी निवडणुकीत जनता उत्तर देईल. तेव्हा हेच आमदार, खासदार शिवसेनेकडे परततील. पण, त्यावेळी शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असा इशारा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी दिला.
निगडीमध्ये झालेल्या निष्ठावंत शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, सह संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, शिरूरच्या महिला संघटिका सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, आशा भालेकर, भाविक देशमुख, तुषार नवले, पांडुरंग पाटील, अमोल निकम, अनिल सोमवंशी, रोमी संधू आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे गटात गेलेल्या खासदार बारणे यांच्याबाबत आमदार अहिर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधून आलेल्या श्रीरंग बारणे यांना मानसन्मान दिला. खासदारकी दिली. मोदी लाटेत कोणालाही ही उमेदवारी दिली असती. पण, ती बारणे यांनाच दिली. ठाकरे यांना सर्व सोडून जातायेत अशा वेळी त्यांनी सोबत राहायला हवे होते. बारणे यांनी स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यास आम्ही स्पष्ट विरोध केला होता. ती सीट आमची आहे, असे म्हटले होते, असेही ते म्हणाले.