… त्यामुळे प्रत्येक ट्रक चालकाच्या केबिनमध्ये ‘एसी’ बसवण्यात येणार…! गडकरींची मोठी घोषणा…

0
251

देश,दि.२१(पीसीबी) – केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक नवीन घोषणा केली आहे. त्यानुसार आता देशातील प्रत्येक ट्रक चालकाचा प्रवास काहीसा सुखद होणार आहे. येत्या २०२५ पासून देशातील प्रत्येक ट्रकमधील चालकाच्या केबिनमध्ये ‘एसी’ बसवण्यात येणार आहे. त्यामुळे चालकांचा प्रवास गारेगार होणार आहे.

आपल्या देशात काही चालक सलग १२ ते १४ तास गाडी चालवतात. इतर देशांमध्ये बस आणि ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. मात्र आपल्या देशात चालक चक्क ४३ ते ४७ अंश सेल्सियस तापमानात सलग इतके तास गाडी चालवतात. यावरून आपण आपल्याकडील चालकांच्या परिस्थितीचा अंदाज लावू शकतो. त्यांचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे.

गडकरी पुढे म्हणाले, “मी जेव्हा मंत्री झालो तेव्हाच मी ट्रकमध्ये एसी केबिन सुरू करण्यास इच्छूक होतो. मात्र, काही लोकांनी यामुळे अनावश्यक खर्च वाढेल असं म्हणत या निर्णयाला विरोध केला. मात्र, १९ जून रोजी मी या निर्णयाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.”

भर उन्हात उष्णतेचा मारा सहन करत सलग १२ ते १४ तास ट्रक चालवणाऱ्या ट्रक चालकांना नितीन गडकरींच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाच्या प्रस्तावाविषयी अनेक दिवस चर्चा सुरू होती. गाडी चालवण्याची कठीण परिस्थिती आणि रस्त्यांची अवस्था यामुळे तासंतास ट्रक चालवणारे चालक थकून जातात. याच कारणाने अनेक अपघातही होतात. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं आहे.