त्याच स्वाभिमानाने हा पुतळा पुन्हा उभा राहिला: देवेंद्र फडणवीस

0
11

दि . ११ ( पीसीबी ) – सिंधूदुर्गात नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या दिमाखात उभारलेल्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जगविख्यात शिल्पकार आणि पद्मश्री राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुतार यांनी छत्रपती शिवरायांचा तब्बल 83 फूट उंचीचा पुतळ्याची उभारणी केलीय. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे कार्यक्रमास उपस्थित आहेत. लोकार्पण सोहळ्यासाठी जमलेल्या नेत्यांच्या उपस्थितीत शिवआरती करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर निनादला.

मालवणच्या राजकोटमधील समुद्रकिनाऱ्याजवळ उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचं किमान आर्युमान 100 वर्ष कायम राहील अशा पद्धतीनं करण्यात आलं असल्याचं शिल्पकार सुतार यांनी सांगितलंय. उपस्थित सर्व नेत्यांनी दिमाखात उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या अभेद्य पुतळ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी पंचरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

गेल्या वर्षी योग्य देखभाल न केल्याने गंज आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पडलेल्या या पुतळ्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल माफी मागितली होती. त्यानंतर नव्या पुतळ्याची उभारणी महत्त्वाची ठरत आहे. दरम्यान, पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. त्याच तेजाने, त्याच स्वाभिमानाने हा पुतळा पुन्हा उभा राहिला आहे. ही एक दुर्दैवी घटना होती, पण आम्ही निर्धार केला होता की विक्रमी वेळेत हा पुतळा पुन्हा स्थापित करूआणि तो तसाच विक्रमी वेळेत उभा राहिला आहे. मी स्वतः पूजन केलं आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. खासकरून शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या काळात हे काम अतिशय वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण झाले. सुतार साहेबांनी अतिशय उत्कृष्ट आणि देखण्या प्रकारचा पुतळा तयार केला आहे. आयआयटीचे अभियंते आणि जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे शिल्पकारही या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होते. या पुतळ्याची रचना इतकी भक्कम आहे की, वादळं, पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तींचाही विचार करून तो तयार करण्यात आला आहे. जवळपास 93 फूट उंचीचा हा पुतळा असून त्यावर 10 फूट उंचीचा चबुतरा आहे. त्यामुळे हा पुतळा एकूण 103 फूट उंचीचा आहे, जो देशातील सर्वात उंच शिवपुतळा ठरतो.

या पुतळ्याचे किमान 100 वर्ष कोणत्याही वातावरणात टिकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचबरोबर पुढील 10 वर्षे या पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी ठेकेदाराकडे असणार आहे. आमचा निर्धार होता की कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला, तेजाला साजेसा भव्य पुतळा उभारायचाच – आणि तो आज आपल्या समोर उभा आहे. याशिवाय आजूबाजूच्या परिसरात उत्तम व्यवस्था आणि सुविधा तयार केल्या जातील. लोकांना शिवरायांचा अनुभव यावा, त्यांच्या भव्यतेची प्रचिती यावी, यासाठी ‘शिवसृष्टी’च्या आधारावर विविध संकल्पनांवर काम सुरू होईल. ही संपूर्ण संकल्पना जागेच्या उपलब्धतेनुसार राबवली जाईल. कोकण युतीच्या अजेंड्यात याला प्राथमिकता देण्यात आली आहे. आम्ही कोकणाला झुकतं माप दिलं आहे आणि यापुढेही कोकणसाठी सरकारचे काम अधिक चांगले आणि ठोस असेल. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.सुरक्षेच्या संदर्भातही आम्ही आढावा घेतला आहे. वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित होते. एसओपी (Standard Operating Procedures) रिव्हाईज करण्यात आल्या आहेत. जिल्हा पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे.”

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची वैशिष्ट्ये
सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्ध समयी बाजात म्हणजेच योद्धा भूमिकेत (warrior pose) असलेल्या तलवारधारी 60 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे.
तलवारीसह पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी आहे. तसेच पुतळ्याच्या चबुतराची उंची १० फूट इतकी आहे.
जमीन पातळीपासून या पुतळ्याची एकूण उंची 93 फुट इतकी आहे.
पुतळा उभारण्यासाठी ब्राँझ धातूचा उपयोग करण्यात आला असुन यामध्ये 88% तांबे, 4% जस्त व 8% कथिल धातूचा समावेश आहे.
पुतळ्यासाठी सरासरी 6 ते 8 मिलिमीटर जाडीचे कांस्य वापरण्यात आले आहे. या कामासाठी DUPLEX स्टेनलेस स्टीलचे सपोर्ट फ्रेमवर्क, स्टेनलेस स्टील SS 316 दर्जाचे सळई असे गंजरोधक बांधकाम साहित्य वापरण्यात आले आहे. चबुतरासाठी उच्च दर्जाचे काँक्रीट तसेच स्टेनलेस सळई वापरण्यात आले आहे.
फियान, निसर्ग, तोक्ते यासारखी वादळे गेल्या काही वर्षात अधिकाधिक तीव्रतेची वारंवार उद्भवत आहेत. त्यानुसार सदर पुतळा सर्व वातावरणीय परिणामांच्या माऱ्यास योग्य प्रकारे तोंड येईल, या पद्धतीने संरचनात्मक संकल्पना करून बांधण्यात आला आहे.
पुतळ्याचे किमान आयुर्मान 100 वर्षे राहील अशा पद्धतीने ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांनी हे काम केले आहे. तसेच पुढील 10 वर्ष नियमित देखभाल व पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे.