त्यांना ५० खोके पचणार नाहीत, थोड्या दिवसात सगळ्यांना जुलाब सुरु होतील – संजय राऊत

0
223

१०० आमदार आणि २५ खासदार परत निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात

नाशिक, दि. ९ (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेना महाराष्ट्रातील सरकारमधून बाहेर पडली आहे. पण आता ठाकरे कुटुंबीयांनी पक्ष वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माझ्याकडे शिवसेना आहे, असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना म्हटले होते. एकनाथ शिंदे गटाचा संदर्भ देत ते म्हणाले होते की, त्यांना सत्तेचा आशीर्वाद मिळावा, पण माझ्याकडे शिवसेना आहे. आता यावरच काम करत आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत हे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे.

“शिवसैनिकाला कोणी पळवून नेऊ शकत नाही. ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही. १०० आमदार आणि २५ खासदार परत निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. त्यांना ५० खोके पचणार नाहीत. थोड्या दिवसात सगळ्यांना जुलाब सुरु होतील. शिवसेनेसोबत बेईमानी करणे सोपे काम नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातली

“काही दिवसांपूर्वी हनुमानाचे जन्मस्थान कोणते यावरुन वाद झाला. पण जगातील सर्व हिंदू धर्माचार्य एकत्र आले आणि त्यांनी सांगितले की हनुमानाचा जन्म नाशिकमध्येच झाला. त्यामुळे हनुमान आणि त्याची गदा ही आपलीच आहे. तसेच शिवसेना ही आमचीच आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातली आणि ते आमचे बाप आहेत. तुम्ही काय हक्क सांगता? तुम्ही तिथे गेला आहात तर सुखाने राहा शिवसेनेचे नाव कशाला घेता? शिवसेना सोडून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हे सांगून टाका,” असेही संजय राऊत म्हणाले.

त्यांची आमदार व्हायची लायकी होती का?

“हिंदुत्वामुळे, उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना सोडली ही कारणे खोटी आहेत. खरी कारणे आता समोर येतील. नाशिकमधील दोन तीन आमदार गेले आहेत. त्यांची आमदार व्हायची लायकी होती का? त्यांच्या पाठीशी शिवसेना ही चार अक्षरे आणि शिवसैनिकांनी घाम आणि रक्त आटवले नसते तर नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडून येणे कठीण झाले असते. पण तुम्हाला आमदार केले,” असा टोला राऊतांनी लगावला.

उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेऊन बाहेर पडले

“कोविड काळात उद्धव ठाकरेंनी कुटुंबप्रमुखाप्रमाणे मार्गदर्शन केले. गोदावरीमध्ये गंगा नदीप्रमाणे मृतदेह वाहिले नाहीत. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात लोकांचे जीव वाचवले आणि हे म्हणतात उद्धव ठाकरे काम करत नाहीत. उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेऊन हे सगळे लोक बाहेर पडले. आता आमची शिवसेना खरी असल्याचे ते म्हणत आहे. शिवसेना आमचा पंचप्राण आहे. लाखो शिवसैनिकांचे प्राण तुम्हाला काढून घेता येणार नाहीत. धनुष्यबाण शिवसेनेचाच राहिल,” असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेशिवाय या आमदारांनी विधानसभेत जाऊन दाखवावे

“महाराष्ट्रात एकदा वणवा पेटला तरी विझवताना कठीण जाईल. एकदा महाराष्ट्र पेटला तर विझत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. भाजपाने शिवसेना संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यांना सरकार पाडता आले नाही तेव्हा शिवसेना फोडली, कोट्यावधी रुपये ओतले, ईडीपासून सीबीआय पर्यंत तपास यंत्रणा वापरल्या. शेवटी त्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले. शिवसेनेशिवाय या आमदारांनी विधानसभेत जाऊन दाखवावे. आज मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. आम्ही लालकिल्ल्याला सलाम करत नाही. मुंबई मिळवण्यासाठी आम्ही संघर्ष केला आहे. दिल्लावाल्यांना आज परत मराठी माणसापासून मुंबई तोडायची आहे. म्हणून शिवसेना तोडली,” असा आरोप राऊतांनी केला.

“२०१४ साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने ६५ जागा जिंकल्या. शिवसेना पाच जागासुद्धा जिंकणार नाही असे भाजपाची घमेंड होती. हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री म्हणून यातील बरेच लोक यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. तेव्हा हिंदुत्व आठवले नाही. २०१९ साली अमित शाह मातोश्रीवर आले होते. त्यावेळी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे ठरले होते. पण निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पाठीत खंजीर खुपसला. तेव्हाही ४० आमदारांपैकी कोणाचाही आत्मा जागा झाला नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली.