जळगाव, दि. २१ (पीसीबी) : अडीच वर्षात त्यांनी घरात बसण्याचे काम केले. आम्ही मात्र अडीच महिन्यात कामे केली. ग्रामपंचायत निवडणुकीत सेना भाजपला मिळालेले यश हीच जनतेने राज्यातील सत्तांतराची पावती दिली आहे. हा तर ट्रेलर आहे, पुढे पिक्चर बाकी आहे. त्यांना औषधालाही ठेवणार नाही असा सणसणीत टोला राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
शिंदे जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे बोलत होते. पाळधी येथे शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण व पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, लताताई सोनवणे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना शिंदे म्हणाले, की आमची बाळासाहेब यांच्या विचाराची शिवसेना आहे. भाजपसोबत आम्ही युती केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या युतीला कौल देऊन कामाची पावती दिली आहे. जर राज्यात महाबिकास आघाडी राहीली असती तर राष्ट्रवादी ने शिवसेनेला गिळले असते. राष्ट्रवादी पराभूत मतदार संघात उमेदवारांना ताकत देत होती. त्यामुळे शिवसेना हाताच्या बोटावर मोजन्यासही शिल्लक राहणार नाही.
हे लक्षात आल्याने आपण सावध केले. पण झोपलेल्याचें सोंग घेणारे जागे कसे होणार? त्यामुळे आपण उठाव करून भाजप बरोबर युती केली. आमची ही नैसर्गिक युती आहे त्यामूळे गद्दार कोण? हे जनतेने ठरवले आहे. आम्ही अभद्र युतीविरुद्ध उठाव केला. अडीच महिन्यात आम्ही आमच्या कामाने उत्तर दिले आहे. त्यांनी गोमुत्र शिंपडले तरी त्यांना काहिही न बोलता कामाने उत्तर देनार आहोत. या पुढे आम्ही अशीच जनतेची कामे करणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गुलाबराव पाटील हे चांगले भाषण करतात. मात्र, त्यांना ते सहन झाले नाही, असे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता ते म्हणाले. आपले महत्व कमी होईल म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवरील गुलाबराव पाटील यांचे भाषण बंद केले. मंत्रीपदासाठी ही त्यांना त्रास दिला त्यांना काय काय करावे लागले असा आरोप त्यांनी केला.
गुलाबराव पाटील म्हणाले की, गेली पस्तीस वर्षे मी राजकारनात आहे. पण माझ्या गावाला पहिला मुख्यमंत्री आला, हे माझे भाग्य आहे. एकनाथ शिंदे हे जनतेचे मुख्यमंत्री आहेत. जनतेलाही ते मनातील मुख्यमंत्री वाटतात. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होईल.