त्यांचे २०-२५ आमदार आमच्याकडे येतील, बावनकुळे यांच्या दाव्याने खळबळ.

0
197

नागपूर, दि. ३० (पीसीबी) : शिवसेनेत बंड होऊन राज्यात एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. यावेळी शिवसेनेचे बरेच आमदार सुरत मार्ग गुवाहाटी येथे गेले होते. त्याला काही महिने झाले असतांनाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुक्रवारच्या वक्तव्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहे. विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात मांडलेला प्रस्ताव सभागृहात आल्यास त्यांचे आणखी २०- २५ आमदार आमच्याकडे येतील असे, बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांना सांगितले.

बावनकुळे पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक स्वतःची नामुष्की , करून घेणार आहे. हा प्रस्ताव आल्यास शिंदे- फडणवीस सरकारला १८४ हून अधिक मते मिळतील. त्यातच विरोधकांचे २०-२५ आमदार पुन्हा आमच्याकडे येणार असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अविश्वास ठराव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसकी बॉम्ब आहे. विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे, त्यांच्यात एकमत नाही. या सरकारने योग्य काम केलं. विदर्भ-मराठवाड्याला न्याय देण्याच्या घोषणा केल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अडीच वर्ष धानाला बोनस मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी १२ तास वीजपुरवठ्याबाबत अजित पवार यांच्यापुढे नाक रगडलं परंतु, काहीच मिळाले नाही. शेवटी या सरकारने विरोधकांनी मागणी न करताही स्वत:हून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व इतरही सर्व घटकांना न्याय दिला, असंही बावनकुळे म्हणाले.

अजित पवार माझे चांगले मित्र, त्यांची आणि माझी चांगली मैत्री, पण अचानक त्यांनी माझ्याबाबत ही भूमिका का घेतली, हे कोडे मला अजूनही उलगडलेले नाही, असे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विधान परिषदेत म्हणाले. अजित पवार बावनकुळें यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचा संदर्भ देत बावनकुळे म्हणाले, बारामतीत जाऊन मी आमच्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणा.असे आवाहन बारामतीच्या जनतेला केले होते. त्यांना एवढे वाईट का वाटले?. मी तर त्यांचे नावही घेतले नाही. तरी ते नाराज झाले. आमचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे तेथे आमच्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणणे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे, आम्ही आमच्या पक्षाचे काम करु. अजितदादांनी एवढे मनावर घ्यायची गरज नव्हती. शेवटी जनताच निर्णय करते. राजकारणात किल्ले उध्वस्त होतच असतात. त्यांचेही किल्ले उध्वस्त झाले आणि आमचेही चांगले किल्ले उध्वस्त झाले. त्यामुळे जनता ठरवेल काय करायचे. अजितदादांनी एवढे नकारात्मक होऊन खालच्या सभागृहात तो विषय उपस्थित करण्याची गरज नव्हती.असे बावनकुळे म्हणाले.