तोतया सीबीआय अधिकाऱ्यास अटक

0
356

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – औषधांच्या वापराबाबत भिती दाखवून तसेच स्वतः सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत मेडिकल दुकानदारांकडून वेळोवेळी खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी तोतया सीबीआय अधिकाऱ्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली.सुरेश जसाराम चौधरी (वय 32, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मांगीलाल घिसाराम चौधरी (वय 37, रा. चिंचवड स्टेशन) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 20) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना 8 डिसेंबर 2022 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत आनंदनगर, चिंचवड येथील भगवती मेडिकल आणि मोशी येथील लक्ष्मी मेडिकल येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश चौधरी याने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ओळखपत्रही दाखविले. तुमच्या मेडिकलमधून दिलेल्या औषधांमुळे पेशंट मरणार आहे. त्याचा गुन्हा दाखल होऊन अटक होणार आहे. अशी भिती घालून वेळोवेळी ब्लॅकमेल करून पाच लाख 58 हजार रुपये देण्यास भाग पाडून खंडणी घेतली. तसेच शहरातील इतर मेडिकल दुकानदार यांनाही सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांनाही गुन्हा दाखल होणार, तुम्हाला अटक होणार, अशी भिती घालून त्यांचीही फसवणूक केली आहे.

याबाबत संबंधित दुकानदाराने खंडणी विरोधी पथकाकडे अर्ज केला होता. त्यानंतर तो दुकानदार गावी गेला होता. यामुळे आरोपीचा माग करून गुन्हा दाखल करण्यास वेळ लागला. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरविंद सावंत यांनी केले आहे.