तळवडे(दि. १२) पीसीबी – बाजारपेठेतील एका कपड्याच्या दुकानात घुसून तोडफोड करत रस्त्यावरील वाहनांची देखील तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या टोळक्याला अटक केली आहे. त्या सहा जणांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिले आहे.
रामेश्वर धनराज कांबळे (वय 19, रा. ओटास्कीम, निगडी), बिलन ऊर्फ शुभम गजानन खवडे (वय 19, रा. रुपीनगर, तळवडे), आदित्य गोरख दुनधव (वय 19, रा. ओटास्किम, निगडी), गणेश परमेश्वर उबाळे (वय 18, रा. ओटास्किम, निगडी), ओंकार शहाजी चंदनशिव (वय 20, रा सहयोगनगर, रूपनगर, तळवडे), विशाल शंकर वैरागे (वय 19, रा. ओटास्किम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आठ जुलै रोजी रात्री रुपीनगर तळवडे येथील मुख्य बाजारपेठेतील एका दुकानात दुकानदाराने चिखलाने माखलेल्या चपला बाहेर काढण्यास सांगितल्याने सहा जणांच्या टोळक्याने दुकानात तोडफोड केली. त्यानंतर दुकानाच्या बाहेर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करून दुकानारावर जीवघेणा हल्ला केला. कोयते हवेत फिरवत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा ओटास्कीम निगडी, आकुर्डी, पिंपरी, भोसरी परीसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर चिखली पोलिसांनी तळवडे बाजारपेठेतून आरोपींची बेड्या ठोकून धिंड काढली. दहशत माजवणारे गुंड बेड्या घेऊन आल्याचे पाहून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. अटक केलेल्या आरोपींपैकी चारजण अल्पवयीन असल्यापासून वेगवेगळे गंभीर गुन्हे करीत आहेत. ते लहान असल्याने त्यांना कायद्याचे अभय मिळत होते. त्यामुळे त्यांना कायद्याची भीती राहिलेली नव्हती. मात्र आता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन चिखलीचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिले.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने, पोलीस अंमलदार साकोरे, सावंत, शिंदे, राठोड, सुतार, पिंजारी, गायकवाड, भोर यांनी केली आहे.