‘ते’ शिक्षण सेवक महापालिका नियमित सेवेत!

0
277

पिंपरी दि..१५ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड महापालिका अंतर्गत काम करणारे 68 शिक्षण सेवक नियमित सेवेत घेण्यात येणार आहे. त्यामुळे 3 वर्षे सेवाकाळ पूर्ण केलेल्या शिक्षण सेवकांना आयुष्यभरासाठी “दिवाळी गिफ्ट” मिळाले आहे.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शिक्षण सेवकांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत कार्यरत 78 प्राथमिक शिक्षण सेवकांपैकी 68 शिक्षण सेवकांचा तीन वर्षे कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण झालेला आहे. शासन निर्णयानुसार, केवळ 6 हजार रुपये तुटपुंज्या मानधनावर संबंधित शिक्षण सेवकांनी सेवा बजावली आहे. 17 सप्टेंबर 2022 अखेर बहुतेक सर्वच शिक्षण सेवकांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्याने आता त्यांना मिळणारे मानधनही बंद होणार आहे. त्यामुळे संबंधित शिक्षण सेवकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे यांनी शिक्षण सेवकांना नियमिततेचे आदेश विनाविलंब मिळावेत यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला होता.

27 सप्टेंबर 2022 रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे , उप आयुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांची भेट घेऊन शिक्षण सेवकांना नियमित वेतन श्रेणीचे आदेश तातडीने मिळावेत. यासाठी चर्चा केली केली होती. आमदार लांडगे यांनी स्वतः पाठपुरावा करून संबंधित शिक्षण सेवकांची मागणी प्रशासनाकडे लावून धरली, अशी माहिती मनोज मराठे यांनी दिली.