ते पाळलेले, त्यांना पैसे मिळतात; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांवर चढवला प्रचंड हल्ला

0
282

पिंपरी,दि.१९(पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांवर प्रचंड हल्ला चढवला आहे. तुम्ही एकदा मुलाखत दिल्यानंतर त्याच्यावरच्या प्रतिक्रिया का वाचता? ट्रोल करणाऱ्यांचे मेसेज वाचताच कशाला? ती राजकारण्यांनी पाळलेली लोक आहेत. त्यांना महिन्याला पैसे मिळतात. हे निरुद्योगी लोकं आहेत. त्यांना कामधंदा नाही. त्यांचं एकच काम आहे. मोबाईल हातात घेतला की मार याच्या आणि घाल बोटं, अशा शब्दात राज ठाकरे यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांची चंपीच केली.

राज ठाकरे यांच्या हस्ते पत्रकारांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी जोरदार भाषण करत ट्रोलर्सवर हल्ला चढवला. तसेच पत्रकारांना कानपिचक्याही दिल्या. पत्रकारांवर हल्ले होतात हे चुकीचं आहे. निषेधार्ह आहे. तुम्ही म्हणताना तुम्ही लिहिल्यावर तुम्हाला ट्रोल केलं जातं. मग वाचता कशाला? मुलाखत झाली, भाषण झालं, एकदा शब्द गेले ना. मग कुणाला काय वाटेल ते वाटेल. कुणाला आवडलं, कुणाला नाही आवडलं हे कशाला वाचत बसता. त्यावर चार शिव्या पडतात. मग आमचा हिरमसून बसतो. कशाला वाचता? मोबाईल नावाचं खेळणं आल्यापासून अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागले. घरात बसून करायचं काय? मार याच्या, घाल बोटं असं सुरू आहे, असा हल्लाच राज ठाकरे यांनी चढवला.

ट्रोल करणाऱ्याला काही पडलेली नसते. तुम्ही कशाला वाटून घेता. त्यांना मागच्या पुढचा इतिहास माहीत नसतो. मुलाखत ऐकलेली नसते. बास फक्त व्यक्त व्हायचं. राजकीय लोकांनी पाळलेली लोकं आहेतच. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता? ते पाळलेले आहेत. त्यांना लिहायचे दर महिन्याला पैसे मिळतात. त्यांचा कसला विचार करता? जे महाराष्ट्र हिताचं असेल, मराठी माणसाच्या हिताचं असेल त्यावर निर्भिडपणे बोलणं आणि लिहिण्याची गरज आहे. आज नाही उद्या पटेल. विरोधकांनाही पटेल. आपण चुकीचं करतो हे त्यांना वाटेल, असं राज म्हणाले.

मंत्र्याकडे पत्रकार कामाला का?
आज अनेक उत्तम सुसंस्कृत पत्रकार आहेत. तसेच वाया गेलेले पत्रकारही अनेक आहेत. आणि ते प्रमुख हुद्द्यावर बसलेले आहेत. मी नागपूरला गेलो परवा. मला लाज वाटली. मला तिथे अनेक पत्रकार भेटले. म्हटलं काय चाललं? ते म्हणाले मंत्र्याकडे कामाला आहे. मंत्र्यांकडे कामाला लागले पत्रकार? मला अजूनही आठवतं 20-25 वर्षापूर्वी मोजके पत्रकार लपून छपून हे करत होते. आता उघड करत आहेत. मग जेव्हा आमच्या पीसी होतात तेव्हा लेबल लावलेले लोक येतात तेव्हा आम्ही काय उत्तरं द्यावीत?, असा सवालही त्यांनी केला.

ते कुठे बोलतील संडासात?
सध्या पत्रकारितेतही भलतंच सुरू आहे. याला काय वाटतं आणि त्याला काय वाटतं हेच सध्या सुरू आहे. टेलिव्हजनवर आजही चांगलं काम करणारे लोक आहेत. पण व्हिज्युअली जे समोर दिसतं ते हेच आहे. राजकारणाची भाषा घसरली. ते वाह्यातपणे बोलत लागेल. कारण तुम्ही दाखवता म्हणून. तुम्ही बंद करा. ते कुठे बोलतील संडासात? असा सवालही त्यांनी केला