“…ते धनंजय मुंडेंना दारू-मुली पुरवतात….”; करुणा शर्मांच्या आरोपांनी एकच खळबळ

0
9

|
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या माजी सहचारिणी करुणा शर्मा यांनी गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे. “धनंजय मुंडेंनी आजूबाजूला दलाल जमवले आहेत, जे त्यांना फक्त दारू आणि मुली पुरवतात,” असा थेट आरोप करुणा शर्मांनी केला असून, त्यांनी मुंडेंच्या खाजगी आणि राजकीय आयुष्यातील अनेक गोष्टींचा पर्दाफाश केला आहे.

करुणा शर्मा म्हणाल्या, “धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर काही लोक थेट आमच्या घरात स्लीपर घालून येत होते. हे त्यांचे मित्र नव्हते, हे दलाल होते. राज घनवट, तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे या लोकांनी त्यांना वाईट सवयी लावल्या.” त्या पुढे म्हणाल्या की, “हेच लोक आज अडीच-अडीच हजार कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक झाले आहेत. पण मी ज्या घरात राहते, त्यावर कर्ज आहे आणि हप्ते भरले जात नाहीत. माझ्या मुलाच्या नावावर एक गाडीही नाही.”

“मुंडेंचं भवितव्य दलालांनी उद्ध्वस्त केलं”

“धनंजय मुंडे आज ज्या अडचणीत आहेत, त्याचं मूळ या दलाल लोकांमध्ये आहे. त्यांनी मुंडेंना दारू आणि वाईट सवयींच्या गर्तेत ओढलं. मी अनेकदा त्यांना सावध केलं, पण ऐकलं नाही. आज जे काही झालं, त्याची मला पूर्वीच भीती वाटत होती आणि तीच भीती आज सत्यात उतरली आहे,” असं करुणा शर्मा यांनी भावनिक शब्दांत व्यक्त केलं.

त्यांनी असंही म्हटलं की, “१९९६ पासून आमचं नातं आहे. २०२१ पर्यंत अनेक वाद झाले, अनेकदा त्यांनी मला सोडलं, पण तरीही मी थांबले. मात्र मंत्री झाल्यावर जे बदल झाले, तेच आमच्या नात्याचं मुळंच खालावून गेले.”

वैयक्तिक आयुष्यात मोठं संकट

करुणा शर्मा यांनी केलेले हे गंभीर आरोप आता केवळ कौटुंबिक नाहीत, तर ते राजकीय आणि सार्वजनिक स्तरावरही मोठ्या प्रतिक्रिया उमटवत आहेत. दलाल मंडळींमुळे एका मंत्र्याचं वैयक्तिक आयुष्य ढासळलं, असा आरोप केल्यामुळे या प्रकरणात आणखी वेगळे पैलू समोर येण्याची शक्यता आहे.