ते कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले…नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांच्यावर खरमरीत टीका

0
286

शिर्डी, दि. २६ (पीसीबी) – महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या नावावर निव्वळ राजकारण होत असल्याची टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. शरद पवार यांचे नाव न घेता ते देशाचे कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले असा रोकडा सवाल करत २०१४ पासून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना आणल्या आणि शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ किती झाला याची आकडेवारीच मोदी यांनी सादर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख त्यांनी कर्मठ मुख्यमंत्री असा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. निळवंडे धरणाचा प्रकल्प ५० वर्षांत पूर्ण करता आला नाही याचे खापर त्यांनी काँग्रेस राजवटीवर फोडले. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण कऱणाऱ्यांनी थेंब थेंब पाण्यासाठी त्याला तळमळायला लावले, असेही कठोर बोल मोदींनी सुनावले.

शिर्डी येथील साई मंदिरात १०० कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या वातानुकुलित दर्शनबारी इमारतीचे उद्घाटन, निळवंडे धरणाचे जलपूजन आणि शेतकरी सन्मान योजनेचे उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी यावेळी मंचकावर उपस्थित होते.

शरद पवार यांचा खरपूस समाचार –
आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या विविध योजनांतून प्रामुख्याने शेतकरी आणि गोरगरिबांना कसा फायदा झाला ते मोदी यांनी अत्यंत विस्ताराने सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता, महाराष्ट्रातील एक बजुर्ग नेते केंद्रात मंत्री असताना त्यांच्याकडे सात वर्षे कृषी खाते होते तेव्हा त्यांनी काय केले असा थेट प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील एक नेते केंद्रात कृषी मंत्री होते. तसा त्यांचा मी आदर करतो पण, सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील शेतकऱ्यांच्यासाठी काय केले. त्यांच्या काळात अवघे साडेतीन लाख क्विंटल धान्य किमान आधारभूत किंमतीनुसार (एमएसपी) खरेदी केले होते, आमच्या सरकारने तब्बल १३ लाख क्विंटल खरेदी केले. २०१४ पूर्वी एमएसपी नुसार खरेदासीठी जास्तीत जास्त ५००-६०० कोटी रुपये खर्च व्हायचे ते आता १ लाख १५ हजार कोटी होतात. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट पैसे जमा होतात. ते कृषीमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या पैशासाठी दललावर अवलंबून रहावे लागायचे, असेही मोदी यांनी नमूद केले.

बाबामहाराज सातारकरांना श्रध्दांजली –
जेष्ठ किर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या निधनाचे वृत्त समजल्याने आपल्या भाषणात मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले, आज सकाळीच मला देशाचे एक अनमोल रत्न वारकरी सांप्रदायाचे वैभव हरिभक्त परायण बाबामहाराज सातारकर यांच्या वैकुंठगमनाची दुःखद बातमी समजली. त्यांनी किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून मोठे समाज प्रबोधन केले. त्यांची मधूर वाणी, प्रवचन करताना बोलण्याची पध्दत, जय जय रामकृष्ण हरी भजन आजही आठवते. मी स्वतः ते ऐकले आहे, आमची त्यांना श्रध्दांजली.

पूर्वीचे आकडे घोटाळ्यांचे आणि आताचे…
केंद्र सरकार गरिबांसाठी किती काम करते ते सांगताना मोदी म्हणाले, गरिबाचा विकास हाच सामाजिक न्याय आहे. गरिब कल्याण हेच आमचे प्राधान्य आहे. गरिब कल्याणचे बजेट आम्ही वाढवले. महाराष्ट्रात १ कोटी १० लाख आयुष्यमान कार्ड दिले. त्यातून पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचाराची गॅरंटी दिली. ७० हजार कोटी खर्च केलेत. केंद्राने गरिबांना मोफत रेशनसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च केलेत. गरिबांच्या घरांसाठीही ४ लाख कोटी खर्च केलेत. ही रक्कम २०१४ पूर्वीच्या तुलनेत सहा पट अधिक आहे. घरघर जल पोहचविण्यासाठी २ लाख खर्च केले. पीएम स्वनिधी योजनेत हजारो रुपयांची मदत गरिबांना मिळाली. आता आणखी एक योजना सुरू केली. पीएम विश्वकर्मा योजना. त्यातून सोनार, लोहार, कुंभार अशा छोट्या व्यावसायिकांना मदत मिळणार आहे. त्यात १३ हजार कोटी रुपये खर्च करत आहोत. हे सगळे आकडे सांगतोय ते लाखो कोटींचे आहेत. यापूर्वी २०१४ चे असेच लाखो-कोटींचे आकडे तुम्ही ऐकले होते ते इतक्या लाखाचा भ्रष्टाचार, एतक्या कोटींचा गफला असे होते. आता तेच आकडे विकासकामांच्या खर्चाचे आहेत.