दि. २२ (पीसीबी) : पोलिसांवर जेव्हा राजकीय दबाव येतो, तेव्हा सत्यशोधनाचा मार्ग पोलिस सोडून देतात. त्यामुळे अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे चालतात आणि अखेर न्याय मिळत नाही. अशा शब्दात खंत व्यक्त करत माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी खळबळजनक दावा केला आहे.
आज जवळपास प्रत्येक विभागात राजकीय हस्तक्षेप आहे. असा दावा करत हा हस्तक्षेप लोकहितासाठी असेल, विकासासाठी असेल तर त्याचे स्वागत करावे, पण न्याय थांबवण्यासाठी असेल. तर त्याला कडक विरोध झाला पाहिजे. अशी भूमिका त्यांनी मांडली.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात राष्ट्रसेवा दल आयोजित कार्यक्रमामध्ये बोरवणकर बोलत होत्या. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यावर भाष्य केले.
राजकीय हस्तक्षेपामुळे मालेगाव, 7/11 बॉम्बस्फोटांमधील मृतांना न्याय मिळाला नाही
मालेगाव बॉम्ब खटला आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला त्याचबरोबर 7/11 ट्रेन बॉम्ब ब्लास्ट यामधील बळींना न्याय मिळाला नाही. या सर्व केसमध्ये गुन्हेगार आणि कट करणारे निर्दोष सुटलेत. यामध्ये व्यवस्थेचे अपयश आहे. या मोठ्या गुन्ह्यांत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना न्याय देऊ शकलो नाही, याला राजकारणी लोकांचा हस्तक्षेप कारणीभूत आहेत. असा दावा बोरवणकर यांनी यावेळी केला.
मला धमकीचा ई-मेल
यावेळी त्यांनी स्वतःसोबत घडलेला प्रकारही शेअर केला. मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. मी कोणत्या विषयावर बोलावं याचा विचार करत होते. तोच माझा एक लेख प्रकाशित झाला आणि त्यावर मला २० ई-मेल व ८ ते १० व्हॉट्सॲप मेसेजेस आले. त्यात काही जणांनी माझ्या धाडसाचे कौतुक केले होते, मात्र त्याचबरोबर एक धमकीचाही ई-मेल आला होता.
‘या कार्यक्रमाला का जाता?’ यानंतर ठरवलं की, आपण याच विषयावर बोललं पाहिजे. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि प्रा. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्यांचा संदर्भ देत खेद व्यक्त केला. या प्रकरणांमध्ये तर अद्याप खटला सुरू देखील झालेला नाही. ही परिस्थिती भयानक आणि धक्कादायक आहे, असल्याचं बोरवणकरांनी म्हटले आहे.