तेव्हा माझ्या पोटात गोळा आला …

0
84
xr:d:DAFb06I1LDs:39,j:4551772165,t:23030114

फडणवीस आणि अजित पवारांचे हेलिकॉप्टर ढगात गेले अन्

महाराष्ट्र, १७ जुलै (पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे भरकटले. परंतु पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या हेलिकॉप्टरमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार हे नागपूरहून गडचिरोलीला प्रवास करत होते. या घटनेनंतर अजित पवार यांनी त्यांना प्रवासात आलेला अनुभव सांगितला. हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असताना माझ्या पोटात गोळा आला होता. पांडुरंगाच्या कृपेने आम्ही सुखरूप पोहचल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेबद्दल अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं. अजित पवार म्हणाले की, जेव्हा नागपूर वरून गडचिरोलीला येत होतो तेव्हा खूप ढग होते. नागपुरातून उड्डाण केलं तेव्हा बरं वाटत होतं. मात्र गडचिरोलीजवळ आल्यावर हेलिकॉप्टर ढगात शिरलं. तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. मी इकडं तिकडं बघत होतो. सर्व घाबरून होते. मात्र देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत प्रवास करत होते. मी त्यांना म्हटलं जरा बाहेर बघा, कुठे झाड दिसेना. कुठे काहीच दिसेना. जमीनही दिसेना. आपण ढगात चाललो आहोत. त्यावर फडणवीस म्हणाले, घाबरू नका. आजवर माझे सहा अपघात झाले आहेत. परंतु मला कधीही काहीही झालं नाही. त्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही. त्यात आज आषाढी एकादशी असल्याने मी सारखं पांडुरंग, पांडुरंग करत होतो. मी माझ्या मनातील भीती फडणवीस यांना सांगत होतो ते मात्र मलाच उपदेश करत होते. काहीही काळजी करू नका असं सांगत होते. तसेच झाले. आम्ही सुखरूप लँड झालो. पूर्वजांची पुण्याई निश्चितच त्यांच्या उपयोगी पडली आहे असंही अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी गडचिरोलीत अनेक विकासकामांचं भूमिपूजन केलं. विविध कार्यक्रमांसाठी दोन्ही नेते गडचिरोलीला गेले होते. दोघांनी नागपूरवरून गडचिरोलीपर्यंतचा प्रवास हेलिकॉप्टरने केला.