मुंबई, दि. २४ –
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापलं आहे. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. अशातच सपाच्या खासदार जया बच्चन यांनी शिंदे यांना “तुम्ही शिवसेना तोडली तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का?”, असा सवाल उपस्थित केला आहे.
स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराच्या गाण्यावरून सुरु असलेल्या वादाचा मुद्दा उपस्थित करत माध्यमांनी बच्चन यांना प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला.
तुम्ही (एकनाथ शिंदे) तुमचा खरा पक्ष सोडून सत्तेसाठी दुसऱ्या पक्षाबरोबर गेलात, मग तुम्ही शिवसेना तोडली, तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, अशा प्रकारे जर बोलण्यावर बंधन लावलं तर तुमचं काय होईल? तुम्ही वाईट परिस्थितीत आहात. तुमच्यावर बंधने आहेत. तुम्हाला फक्त यावर बोलण्यास सांगितलं जाईल आणि दुसरे काहीही नाही, म्हणजे जया बच्चन यांची मुलाखत घेऊ नका. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? विरोधकांना मारहाण करणे, महिलांवरील बलात्काराच्या घटना, हत्येच्या घटना असे अनेक मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.
कुणाल कामराने आपल्या कवितेत एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला आहे. तसेच या कवितेत गुवाहाटी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक भुमिका घेतली आहे.
‘शिवसेना भाजपमधून बाहेर पडली. मग शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी उदयास आली. एका मतदाराला 9 बटणं देण्यात आली. सगळे गोंधळले होते. पार्टी एका व्यक्तीनं सुरू केली होती. ती व्यक्ती ठाण्यातून येते, जो मुंबईतला एक सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. असं वक्तव्य कामरा याने केले आहे.
तसेच, ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये… ‘ म्हणत कामराने दिल तो पागल है चित्रपटातील भोलीसी सूरत या गाण्याच्या चालीवर शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केली. त्याने हा शोचा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरही शेअर केला आहे.
त्यानंतर शिंदेसेनेनं आक्रमक भूमिका घेत कार्यक्रम झालेल्या हॉटेलची तोडफोड केली. या घटनेनंतर मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे 40 शिवसैनिंकावरही गुन्हा दाखल केला आहे.