तेलंगणात मारवाडी हटावो मोहिमेचा जोर वाढला

0
4

दि. २४ (पीसीबी) : स्थानिक व्यापार्‍यांनी मारवाडी व्यावसायिकांवर बंदी घालण्याची घोषणा केल्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला आहे. अल्प किमतीत वस्तुंची विक्री, स्थानिक व्यवसायावर नियंत्रण आणि रोजगार संधी अल्प होणे, असे आरोप त्यांनी केले आहेत. मारवाडी त्यांच्या दुकानांमध्ये ५० टक्के बनावट वस्तू विकत असल्याची खोट्या तक्रारी केल्या जात आहेत. काही ठिकाणी मारवाडी लोकांवर आक्रमण करण्यात आल्याच्या घटना घडल्याचेही सांगितले जात आहे.

मारवाडींना विरोध करणारे रोहिंग्यांविषयी गप्प आहेत ! – केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते बंडी संजय कुमार यांनी या विरोधामागे सत्ताधारी काँग्रेस, भारत राष्ट्र समिती आणि ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, विरोध करणारे लोक येथे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणारे आणि समाजास धोकादायक असणार्‍या रोहिंग्यांविषयी गप्प आहेत; पण ते मारवाडी समाजाला लक्ष्य करत आहेत, ज्याने तेलंगाणाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात योगदान दिले आहे आणि कधीही राज्याला लुटले नाही. अशा मारवाडी समाजाला विरोध करणे लज्जास्पद आहे. भाग्यनगरचा जुना भाग आय.एस्.आय.चे (पाकिस्तानची इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणेचे) अड्डे झाले आहेत आणि येथे अनेक रोहिंग्या लपून बसलेले आहेत. काही विशेष व्यवसाय काही विशिष्ट लोकांकडून हिसकावले गेले आहेत. ‘नईम मटन शॉप’ आणि ‘सलीम ड्रायक्लिनिंग शॉप’ अशी नावे त्याचा पुरावा आहेत. ज्या कामांत हिंदु खाटिक समाज (मांस विक्रीची दुकाने) आणि परिट समाज (कपडे धुणे) कार्यरत होता, ते आता एका विशेष वर्गाच्या (मुसलमानांच्या) हातात गेले आहेत. यावर हे लोक गप्प का आहेत ? मारवाडी समाजाने कधीही सत्तेचा मोह केला नाही, उलट राज्याच्या प्रगतीत भागीदार झाले आहेत, मग त्यांनी तेलंगाणा का सोडावे ?

मारवाडी समाजाला अपकीर्त करणार्‍यांना सोडणार नाही ! – टी. राजा सिंह
आमदार टी. राजा सिंह म्हणाले की, जे लोक मारवाडी समाजाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही. अशा लोकांना कायद्याच्या अंतर्गत कारागृहात पाठवले जाईल. मारवाडी, गुजराती आणि राजस्थानी समाज तेलंगाणाच्या विकासात मोठी भूमिका बजावत आहे. त्यांचे पूर्वज इथेच जन्मले आणि इथेच स्थायिक झाले. या समाजांनी श्रम करून व्यापार उभा केला आहे. आज ते राज्याच्या अर्थव्यवस्थेला भक्कम करणारे मुख्य स्तंभ आहेत. अलीकडे काही लोक त्यांना लक्ष्य करत आहेत. त्यांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि कधीही स्वीकारले जाणार नाही.