तुरुंगात टाकण्यापूर्वी माझ्यावर पक्ष सोडण्याचा दबाव होता; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

0
34

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तुरुंगात टाकण्यापूर्वी आपल्यावर शिवसेना सोडण्यासाठी प्रचंड दबाव होता. आपण त्या दबावाला बळी पडलो नाही, त्यामुळे आपल्या तुरुंगात जावे लागले. दुसरीकडे अजित पवार, प्रुफल्ल पटेल यांनी सोयीनुसार भूमिका बदलली. त्याचा फायदा त्यांना आता मिळत आहे. आता नवाब मलिक यांचीही संपत्ती त्यांना परत मिळेल, असे खासदार राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांची एक हजार कोटींची संपत्ती जप्त केली. प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट मिळाली. नवाब मलिक यांनाही क्लीन चिट मिळणार आहे. प्रफुल्ल पटेल यांची ३०० कोटींची संपत्ती जप्त केली होती. प्रफुल्ल पटेल यांच्यावर दाऊद इब्राहिमसंदर्भात आरोप होता. त्या सर्व दबावांमुळे ते भाजपसोबत गेले. माझ्यावर शिवसेना सोडण्यासाठी प्रचंड दाबाव आणला गेला होता. मला तुरुंगात टाकण्यापूर्वी पक्ष सोडण्याचे सांगितले गेले होते. परंतु मी शिवसेनेसोबत राहिला. त्यामुळे मला तुरुंगात टाकले गेले. माझे राहते घर जप्त केले. मराठी माणसाचे राहते घर मुंबईत किती असणार? ते ही ईडीच्या ताब्यात आहे. माझी गावाकडची वंशपरंपराने मिळालेली जमीन ताब्यात घेतली.

राज्यभरातून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. परंतु निवडणूक आयोग डोळ्यावर झापडे लावून बसले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चार वर्षांपासून निर्णय होत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेऊ नका, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयावर केली. संजय राऊत यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, मी दादांचे अभिनंदन करतो. त्यांच्यावर सुरु झालेल्या कारवाईनंतर अस्वस्थ झाले होते. ते तणावाखाली आले होते. त्यांची हजारो कोटींची प्रॉपर्टी जप्त केली गेली होती. परंतु त्यांनी पक्ष सोडला आणि सर्व तणाव त्यांचा गेला. त्यासाठी त्यांना वडिलासमान काकांच्या पाठित खंजीर खुपसावा लागला, असे राऊत म्हणाले.