नांदेड, दि. 14 (पीसीबी) : जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आलेल्या एका 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शांताबाई शिवाजी मोरे (53, रा. भनगी, ता.जि. नांदेड) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणावरून छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. काल नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होता. सकाळी दहा वाजल्यापासून महिलांना सक्तीने बोलण्यात आले. यात एका महिलेचा मृत्यू झाला. पण प्रशासनाकडून सांगितले की, अटॅक आला. तुम्ही पैसे द्या. त्यांच्या अकाउंटवर पैसे टाका तुमचं कौतुक आहे. पण राजकीय स्टंट करू नका, असे म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढण्याचा आमचा माणस आहे आणि अनेक लोक आमच्याशी संपर्कात आहेत. आम्ही विस्थापित लोकांना संधी देणार आहोत. पण चांगले लोक प्रस्थापितांमधून आले तर त्यांचे पण आम्ही स्वागत करू. मविआ आणि महायुतीत गोंधळ सुरु आहे. त्यांनाच माहीत नाही की त्यांचे नाराज लोक कुठे जाणार आहेत. थोड्या दिवसात वेगळे चित्र दिसेल. मनोज जरांगे पाटील यांना मी विनंती केलेली आहे की, पाडण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपली लोकं तुमच्या माध्यमातून असेल किंवा स्वराज्याच्या माध्यमातून असेल हे लोक विधानसभेच्या पटलावर आपला आवाज मांडू शकतील, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
उद्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे , मात्र सरकारने मराठा समाजाला दिलेल दहा टक्के आरक्षण टिकेल की नाही याबाबत समाज शाश्वत नाही, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. समाजाचा आग्रह होता मराठा कुणबी एकच आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं नाही. मी सुद्धा ही लढाई 2007 पासून लढलो. दहा टक्के आरक्षण टिकेल की नाही माहित नाही, असे त्यांनी म्हटले आहे.