तुम्ही झोपेत असताना पहाटे सव्वाचार वाजता मनोज जरांगेंची सभा

0
202

मुंबईत मंत्र्यांचे बंगले, विमान बघायचे आहेत, ‘सामान्य मराठ्यांची ताकद दाखवायची वेळ आली’

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : मराठा नेते मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. त्यांचा मोर्चा आज पुण्याला पोहोचला आहे. मनोज जरांगे यांनी दिवस-रात्र स्वत:ला मराठा आरक्षणाच्या आंदोलनात झोकून दिलं आहे. मनोज जरांगे यांचा मोर्चा आज सकाळी वाघोली येथून पुण्याच्या दिशेला पुढे लोणावळाकडे निघाला. वाघोली ते पुणे शहर असे १२ किलोमीटर अंतरासाठी तब्बल ११ तास लागले. पुढे औंध मार्गे
थेरगाव डांगे चौकात पोहचायला पहाट झाली. भल्या पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी मनोज जरांगे यांच्या सभेला सुरुवात झाली. यावेळी मनोज जरांगे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. लोणावळ्यात पोहचायला सकाळचे आठ वाजले.
“ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत आणि आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्यात यावे. पोरं मोठी करायची असतील तर मुंबई गेल्याशिवाय पर्याय नाही. आपला बांधव आता मुंबईकडे निघाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तमाम मराठा समाजाने मुंबईत येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ताकदीने आंदोलन करा, पण उद्रेक नको”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
“आता ही लढाई आपल्याला जिंकायचीय. मराठ्यांच्या एकजुटीमुळे मराठ्यांचं कल्याण होणार आहे. मराठा एकत्र आला तर ही मराठा जात प्रगत जात म्हणून पुढे येणार आहे. आपल्या पोरांना आरक्षण देण्याबरोबरच आता मराठा समाजाने दारू सोडायची आहे. सर्व मराठे माझ्यासारखे शांत आणि संयमी नाहीत, त्यांच्या नादी लागू नका. हे मराठ्यांचे पोरं लय बेक्कार आहेत”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
“छगन भुजबळ यांचे नाव नका घेऊ. त्यांचे नाव घ्यायला त्यांची लायकी तरी पाहिजे. त्याला मी उलटसुलट करायला खंबीर आहे. कागदाची पिशवी घेऊन फिरत आहेत. त्याच्या भाषणात माझीच हिंदी वाचवून दाखवत आहे. छगन भुजबळ याचे नाव घेतले तर माझी हिंदी बिघडून जाते. पोरं मुंबई म्हणाले म्हणून मीही म्हणालो चलो मुंबई. मी सरकारला म्हणाले होतो आमच्या नादी लागू नका”, असं जरांगे म्हणाले.

“जगात सर्वात जास्त नोंदी मराठा समाजाच्या आहेत. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत. आपल्या शासकीय नोंदी मिळल्या आहेत तरी आरक्षण मिळत नाहीत. म्हणून आता मुंबई जायचे. आपल्या विरोधात एक टीम काम करत आहे. त्यांना मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणे लावायची होती. पण ते ही त्यांना जमले नाही. सामान्य मराठ्यांची काय ताकद आहे आता दाखवायची वेळ आली आहे”, असं जरांगे म्हणाले.

‘जो उद्रेक करेल तो आपला नाही’
“गरीब आणि श्रीमंताच्या मुलांचे एकच स्वप्न आहे पण ते आरक्षण नसल्याने हुकले. जसे पाणी महत्त्वाचे तसे आरक्षण महत्त्वाचे आहे. आता आपल्या विरोधात बोलणाऱ्यांनी बोलने बंद केले. 70 वर्ष झाले, माझ्या जातीला फसवले आणि मूर्खात काढले. सरकारने मला शत्रू मानायला सुरुवात केलं. पण मी तुम्हाला भीत नाही आणि मोजीतही नाही. माझ्याकडे काहीच नाही, मी दुसऱ्याच्या गाडीत फिरतो. माझ्या घरावर सिमेंटपत्रे आहेत. मराठा जातीसाठी मी गोळ्या झेलायला तयार आहे. आंदोलन शांततेत करा जो उद्रेक करेल तो आपला नाही”, अशी तंबी जरांगेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली.

मनोज जरांगे आणखी काय-काय म्हणाले?
“मुंबईत मंत्र्यांचे बंगले, विमान बघायचे आहेत. मी समाजापुढे जात नाही आणि समाजही माझ्यापुढे जात नाही. थरकाप उडाला पाहिजे एवढ्या ताकदीने मुंबईला या. मुंबईत खिंड लढवताना गावाकडची खिंड तुम्ही लढवा. येवल्याच्याला आरक्षण भेटल्यानंतर त्याला बघू. त्याला सांगितले होते तू आरक्षणमध्ये पाचर मारली मी तुझी पाचर काढून खुटा मारला”, अशी टीका जरांगेंनी केली.

“रात्र-पहाट एकत्र करा, एवढीच संधी आहे. आता पाठीचा, पोटाचा त्रास होत आहे, बेल्ट लावावा लागतो. नेत्यांची पोरं मोठे करू नका, आपले काय ऊस तोडायला पाठवायचे का? आता आरक्षण भेटल्याशिवाय माघार नाही. आता लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय मुंबईतून माघार नाही”, असं जरांगे म्हणाले.

“मला खरे सांगा मुंबईला येणार आहेत का? मला काही झाले तर हे आग्या मोहळ माझ्यासोबत आहेत. गोवा, हरियाणा, राजस्थान, बिहारमधील मराठे एकत्र येणार आहेत. तुम्ही आम्हाला चार बाजूने घेरले तर आम्ही दाही बाजूने घेरु. मराठ्यांचे गणितं करणं आता सोपे राहिले नाही. अर्धे मराठे मुंबईत गेले आहेत. आता घरी राहायचे नाही आणि मागे हटायचे नाही. सरकारने समाजाच्या भावना समजून घ्याव्यात. जर कोणाला काही झाले तर हा समाज कुणाच्याच हातात नाही”, असा इशारा जरांगे यांनी दिला.

“मागासवर्गीय आयोग आता रात्र दिवस काम करत आहे. मला माझ्या जातीचा स्वाभिमान आहे , आता माझा समाज एकत्र आला आहे. मुंबईक
डे जाताना गाड्या एका बाजूने चालवा, गाड्यांमध्ये अंतर ठेवा, रुग्णवाहिकेसाठी रस्ता ठेवा. राजकीय भविष्य आणि कोणावर गुलाल टाकायचे हे मराठ्यांच्या हातात आहे”, असं जरांगे म्हणाले