सोलापूर,दि.०३(पीसीबी) – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी संताप व्यक्त केला. महिलांना वस्तू म्हणून समजणे,त्यांनी काय खावे,त्यांनी कसे वागावे, हे सांगणं म्हणजे महिलांवर प्रतिबंध आणणे. तुम्ही आम्हाला देशप्रेम शिकवू नका, अशी घणाघाती टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी संभाजी भिडे व भाजपवर केली आहे.
संभाजी भिडे हे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी मंत्रालयाबाहेर एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संभाजी भिडे यांनी तिला, ‘तू आधी कुंकू लावून ये, मगच तुझ्याशी बोलेन’, असे सांगितले. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो, असे भिडे यांनी म्हटले. संभाजी भिडे यांच्या या बुरसटलेल्या मनोवृत्तीच्या वक्तव्यावर राज्यभरातून प्रचंड टीका झाली होती. या सगळ्यानंतर प्रणिती शिंदे यांनीही संभाजी भिडे यांना फटकारले.
भारत जोडो यात्रेच्यानिमित्ताने झालेल्या पत्रकारपरिषदेत प्रणिती शिंदे यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रे निमित्ताने महाराष्ट्र राज्यात येत आहेत.सोलापुरातील असंख्य कार्यकर्ते हे राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होतील ,त्याचे नियोजन कसे असेल,याबाबत सोलापूर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानावर प्रणिती शिंदेनीनी खडे बोल सुनावले.महिलांनी कसे रहावे,कसे वागावे यावर हे बोलणारे कोण आहेत.उलट यांच्या सरकारच्या कार्यकाळात महिलांवर अधिक अत्याचार झाले आहेत. महिलांनी कसे रहावे,कसे वागावे हे आम्हाला शिकवू नका,आमच्या हृदयात देशप्रेम आहे.तुमच्यासारखं केवळ पक्षप्रेम नाही, असे प्राणिती शिंदे म्हणाल्या.
संभाजी भिडेंना ते वक्तव्य भोवणार?
संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. मात्र संभाजी भिडेंना हे वक्तव्य आता चांगलंच भोवणार असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना आपल्या भूमिकेचा तात्काळ खुलासा करण्यास सांगितले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे, असे आयोगाने म्हटले आहे.