तुम्हाला माहित आहे का… बिंहारमध्ये IIT गुणवंतांचे हे एक गाव

0
259

देश, दि. ०३ (पीसीबी ) – आयआयटीची परीक्षा ही इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान क्षेत्रातली कठीण परीक्षा समजली जाते. आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी हुशार असणारच याची खात्री कंपन्यांना असते. त्यामागे कारणही तसंच आहे. आयआयटीत शिक्षणासाठी निवड होणं कठीण आणि तिथलं शिक्षण दर्जेदार असतं. आयआयटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थाला खूप अभ्यास करावा लागतो. तरच या परीक्षेत यश मिळतं. या अभ्यासाची तयारी करण्यासाठी सध्या अनेक क्लासेस उपलब्ध आहेत. त्यामुळे देशभरातून अनेक विद्यार्थी दरवर्षी आयआयटीमध्ये निवड होण्यासाठी मेहनत करतात. त्यापैकी सगळ्यांनाच आयआयटीमध्ये प्रवेश मिळत नाही. मात्र बिहारच्या गया जिल्ह्यातील एका गावातील जवळपास प्रत्येक घरातील विद्यार्थी आयआयटीमध्ये निवडून येतो. त्यामुळे या गावाची ओळखच आयआयटीयन्सचं गाव अशी झाली आहे.

महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील काही गावांतील प्रत्येक घरातलं कुणीतरी लष्करात देशसेवा करतं त्याच धर्तीवर हे आयआयटीयन्सचं गाव. ‘झी न्यूज हिंदी’नं या गावाबद्दल सविस्तर वृत्त दिलं आहे. बिहारच्या गया जिल्ह्यातलं पटवा टोली गाव आयआयटीयन्सचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावातली जवळपास डझनभर मुलं दरवर्षी आयआयटीची निवड चाचणी पास होतात. देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळते. 1996 पासून आजवर अशा पद्धतीनं अनेक विद्यार्थी या गावातून आयआयटीमध्ये गेले आहेत. आयआयटीसाठी कोचिंगची सुविधा ठिकठिकणी उपलब्ध असताना या गावातले विद्यार्थी मात्र विनाकोचिंग या परीक्षेत उत्तीर्ण होतात, असं सांगण्यात येतं. आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणं सोपी गोष्ट नसते. मात्र पटवा टोली गावातील विद्यार्थी कोचिंग क्लासेसशिवाय ही परीक्षा पास होतात. गावातील लायब्ररीची मदत ते यासाठी घेतात. याच गावातील तरुण विद्यार्थ्यांकडून हे वाचनालय चालवलं जातं. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.

या गावातील ज्या विद्यार्थ्यांनी आयआयटीमधून शिक्षण घेतलं आहे, ते तरुण या गावातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोचिंग देतात. या कोचिंगमुळे इथल्या विद्यार्थ्यांना आयआयटीची निवड परीक्षा देणं सोपं होतं. दरवर्षी या गावातील विद्यार्थ्यांचा आयआयटीच्या निवड परीक्षेतील सहभाग उत्तम असतो. अनेक विद्यार्थ्यांची आयआयटीमध्ये शिक्षणासाठी निवड होते. त्यामुळेच या गावाला आयआयटी गाव अशी ओळख मिळाली आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी म्हणजे स्वप्नवत ठिकाण असतं. मात्र तिथे जाण्याचा रस्ता सोपा नसतो. अनेक जण तर या रस्त्यावर अडखळतातच, मात्र पटवा टोली गावातले विद्यार्थी याला अपवाद ठरताहेत. आजवर अनेक विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये शिक्षण घेऊन पुढची वाट सुकर केली आहे. पटवा अर्थात विणकर जमातीच्या लोकांचं गाव म्हणून याचं नाव पटवा टोली पडलं. मात्र इथल्या जिद्दी विद्यार्थ्यींनी गावाची ओळख आयआयटीयन्सचं गाव अशी बदलली आहे.