“तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायची सवय…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगेंचा संताप

0
208

जालना, दि. ८ (पीसीबी) – मराठा आरक्षणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले होते, “मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहीजे, यात कुणाचंच दुमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात एकमत आहे. परंतु आज राज्यात ६२ टक्के आरक्षण आधीपासूनच आहे. आता आणखी आरक्षण देण्यासाठी कायदेशीर मार्ग तपासावे लागतील. पण काही लोक टोकाची भाषा वापरत आहेत. मुंबईला येण्यासंबंधी घोषणा करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन ७५ वर्ष झाली. आजही त्याच संविधानाच्या आधारावर देश मार्गक्रमण करत आहे. संविधानाने घालून दिलेल्या चौकटीचा आदर झाला पाहीजे. जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी केला, तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही, हेदेखील लक्षात ठेवा.”

अजित पवारांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. जरांगे पाटील अजित पवारांना उद्देशून म्हणाले, तुम्ही आधी मराठा आरक्षणावर काहीच बोलत नव्हता ते बरं होतं. लोकांना वाटत होतं तुम्ही शांत आहात याचा अर्थ तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने असाल. तुमचा आरक्षणाला पाठिंबा आहे किंवा नाही याबाबत लोकांमध्ये सांशकता होती. कोणलाही काहीच कळत नव्हतं. परंतु, आता तुमच्या भूमिकेशी मराठ्यांना काहीच देणंघेणं नाही. तुमचं बारामतीवर किती प्रेम आहे ते सगळ्यांना माहिती आहे. परंतु, मराठ्यांविषयी तुमच्या पोटातलं आता ओठांवर आलं आहे. तुम्हाला पूर्वीपासून ती सवय आहे. मराठ्यांचं वाटोळं करायची तुम्हाला सवय आहे. ती तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. तुम्हीच छगन भुजबळला मराठ्यांच्या अंगावर सोडलंय. कालच्या तुमच्या बोलण्यावरून ते सिद्ध झालं आहे.