या जगात पारंपारिक चौकटीत राहून आपले जीवन सामन्यांप्रमाणे जगणाऱ्या अनेक लोकांचा भरणा असला तरीही त्या चौकटींची मोडतोड करण्याचं, व्यवस्थेविरोधात बंड करण्याचं, परिस्थितीला जिंकण्याचं धाडस, अंगी वेड असलेली माणसंच करू शकतात. मराठी सिनेमा दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे तळागाळातून आलेला असाच सृजनाचं वेड जपणारा तरुण आहे…
सिनेमातलं क, ख ही ज्याला माहित नव्हतं असा भाऊराव आज मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिभाशाली दिग्दर्शकांपैकी एक आहे. आपल्या पहिल्याच सिनेमात त्यानं जीव ओतला आणि भाऊचं नाव देशभरात गाजलं . आज दिग्दर्शक नागराज मंजुळेच्याही पुढं जाण्याची ताकद भाऊमध्ये आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे भाऊ नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतो. मात्र हा भाऊ नेमका कुठून आला आणि त्याच्यात असं काय आहे ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो, याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ… त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा..
भाऊराव हा सामान्य शेतकरी कुटुंबातील पोरगा, अहमदनगर जिल्ह्यातील शिरूर गव्हाणवाडी या छोट्याशा खेड्यातला त्याचा जन्म. भाऊरावला लहानपणापासूनच शिक्षणाची फारशी गोडी नव्हती, पण त्याला वाचायला खूप आवडायचं. हातात येईल ते पुस्तक वाचायचं. कात्रणं वाचायची. गुरं-ढोरं चरायला नेतानाही भाऊरावच्या हातात पुस्तक असायचचं. पुस्तक वाचण्याबरोबरच भाऊरावचा दुसरा छंद म्हणजे चित्रपट पाहणे. भाऊच्या आयुष्यात त्यानं बघितलेला पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’. त्या वेळी भाऊ सहा-सात वर्षांचा होता. त्याच्या गावात एकाच घरात टीव्ही होता. तिथं दर रविवारी मराठी चित्रपट असायचे. ते बघायला मिळावे, म्हणून भाऊ रविवारची आतुरतेनं वाट बघायचा. त्या वेळी व्हिडिओ आणि प्रोजेक्टरवर त्याच्या गावात चित्रपट यायचे. तेही चित्रपट भाऊ न चुकता बघायचा. याच काळात चित्रपट निर्मितीबाबतचा एक लेख त्याच्या वाचनात आला. त्यानंतर त्याला चित्रपटाचा नायक होण्यापेक्षा दिग्दर्शक व्हावं, असं वाटू लागलं. चित्रपट निर्मितीचं बीज याच वेळी त्याच्या मनात रुजलं.
पण चित्रपट कसा बनवायचा हे त्याला उमजत नव्हतं. कॉलेज सुरू होतं, याच दरम्यान त्याला समजलं, पुण्याला, ‘एफटीआयआय’ नावाची संस्था आहे. पण त्याच्यासाठी पुणेही तेव्हा खूप दूर असण्याचे दिवस होते. पुण्याला जायचं मनात होतं, पण योग येत नव्हता. एक दिवस शेतात पिकलेल्या कांद्याची विक्री करण्याच्या निमित्ताने गाडीसोबत पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये तो आला. तिथून चालत ‘एफटीआयआय’च्या पत्त्यावर पोहोचला. चौकशी केली. समजलं, इथं प्रवेश घ्यायला किमान पदवीधर शिक्षण आवश्यक आहे. मग परत गेल्यावर मुक्त विद्यापीठात बीएसाठी प्रवेश घेतला. बीए पूर्ण झाल्यावर मग अहमदनगरला मास मीडियाला अॅडमिशन घेतलं. फार कमी लोकांना हे माहिती असेल, पण नागराज आणि भाऊराव एकाच कॉलेजात शिकले. अहमदनगरच्या न्यु आर्ट्स महाविद्यालयातून भाऊरावनं एकत्र मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भाऊराव त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाला. चित्रपट बनवायचा, मोठा दिग्दर्शक व्हायचं हेच ते स्वप्न. संपूर्ण बालपण गावात गेलेलं. त्यामुळे रोमारोमात भरलेलं गावपणच भाऊचं मुख्य हत्यार ठरलं. ख्वाडा हा भाऊरावचा ग्रामीण विषयाशी संबंधित पहिला चित्रपट. जमीन विकून, मित्रांकडून पैसे उधार घेऊन भाऊनं ख्वाडा बनवला. या चित्रपटाला पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ही भाऊरावसाठी कौतुकाची थाप तर होतीच पण या पुरस्कारामुळं भाऊला नवी उमेद मिळाली आणि पुढे त्याने बबन साकारला. ख्वाडाप्रमाणेच बबनलाही प्रेक्षकांकडून दाद मिळाली. फक्त दोन चित्रपटातचं भाऊन भरघोस यश प्राप्त केलं. यानंतर आता २६ एप्रिलला TDM द्वारे भाऊ पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येतोय.
स्थानिक सामाजिक प्रश्नांना सिनेमाच्या माध्यमातून वाचा फोडताना, भाऊनं आपल्या कलाकृतीतून प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडलं आहे. आज नागराजच्या खांद्याला खांदा लावून भाऊ मराठी चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर नेतोय. जरी दोघांची स्वप्न सारखीच असली, त्यांची काम करण्याची शैली, चित्रपटांचे विषय सारखेच असले, तरी एक बाब भाऊचं वेगळेपण दाखवते. ती म्हणजे, दिग्दर्शकाव्यतिरिक्त भाऊमध्ये लपलेला मार्गदर्शक..
एक वेळ अशी होती, जेव्हा चित्रपट हे त्यात दिसणारे नट आणि नटी मिळून बनवतात असं भाऊला वाटायचं. कदाचित हा असंमजस, चित्रपटांचं अपुरं ज्ञान असलेला भाऊ आजही खेडोपाड्यात असेल, असं त्याला वाटतं असावं. आणि तरुणांमधील हाच संभ्रम दूर व्हावा, त्यांना सिनेमांचं पूर्ण ज्ञान मिळावं म्हणून भाऊ नेहमी तरुण पिढीला मार्गदर्शन करताना दिसतो. नायक किंवा नायिका बनण्यासाठी काय करावं, अभिनयाव्यतिरिक्तही इतर अनेकं काम असतात, जी सिनेसृष्टीत केली जातात, ती कोणती, दिग्दर्शन, चित्रपट निर्मिती कशी केली जाते, अशा सिनेमांशी संबंधित नानाविध प्रश्नावर भाऊ बोलत असतो.
भाऊ नेहमीच वेळ काढून ग्रामीण भागातील तरुणाईला मार्गदर्शन करत असतो. विविध मंचांवरून तो तरुणाईसोबत अनेक विषयांवर बोलतो. शेतकरी बांधवांच्याप्रती त्याच्या मनात खूप जास्त प्रेम असल्याचे त्याच्या बोलण्यातून नेहमी जाणवते. अतिशय सोप्या – साध्या भाषेत तो संवाद साधत असल्याने त्याचे बोलणे तरुणाईच्या मनाचा ठाव घेते. शेतकरी बांधवांच्या व्यथा, वेदना भाऊने अतिशय जवळून पाहिल्या असून त्याच्या सिनेमात याचे प्रतिबिंब दिसते. भाउच्या सिनेमात नेहमीच शेतकरी हा केंद्रस्थानी असतो भाऊच्या चाहत्यांच्या संख्या मोठी असून त्याच्या याच गुणांमुळे तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. यामुळेच सिनेसृष्टीच्या क्षितिजावर असणारा भाऊराव कऱ्हाडे नावाचा तारा आपले अढळस्थान निर्माण करणार याबाबत कोणतीही शंका नाही