‘तुमची मुले नीट वागतात का,’ असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील बांधकाम व्यावसायिकांना केला. ‘वाहन नीट चालवीत आहेत याची खात्री करून घेतल्यानंतर मुलांच्या हातामध्ये वाहन द्या,’ असा सल्लाही पवार यांनी दिला.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेच्या बारामती शाखेच्या पदग्रहण सोहळ्यात अजित पवार बोलत होते. पुण्यात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने महागडी मोटार चालवून कल्याणीनगर येथे केलेल्या अपघातामध्ये दोन तरुण अभियंते दगावले. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बांधकाम व्यावसायिकांची कानउघाडणी केली.
पवार म्हणाले, ‘मुले रात्री नक्की कुठे जातात, काय करतात या गोष्टींकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. मुलांचे लाड करण्यातून जबरदस्त किंमत मोजावी लागते. चुका केल्या तर कायदा कोणालाही सोडणार नाही.’
बारामती येथील गरुड बाग, क्रीडा संकुल, आयुर्वेद महाविद्यालय या ठिकाणी होत असलेल्या विकासकामांची पाहणी करून अजित पवार यांनी रविवारी ठेकेदारांना सूचना केल्या. ‘विकासकामे वेळेत पूर्ण करताना कामाचा दर्जा उत्तम प्रतीचा असला पाहिजे,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव या वेळी उपस्थित होते. सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी अजित पवार यांनी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या.