तुमचा उमेदवार गुन्हेगार आहे का, KYC-ECI ॲपवर सर्व माहिती उपलब्ध

0
191
  • निवडणुकीतील काळ्या पैशांवर ‘वॉच’

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. ५४३ जागांसाठी १९ एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. सात टप्प्यात मतदान पार पडेल आणि ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान स्वच्छता आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी देशातील प्रत्येक मतदान केंद्रावर सायंकाळी ५ नंतर स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीदरम्यान कागदाचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक आयोगाची माहितीपत्रिका, पुस्तके ही डिजिटल स्वरुपात दिली जात आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवून त्या डाऊनलोड करू शकता, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

आजवर ११ निवडणुकीत ३४०० कोटींची रक्कम जप्त
राजीव कुमार म्हणाले की, आम्ही तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर करत आहोत. मतदार, निवडणूक पार पाडणारी यंत्रणा आणि राजकीय पक्ष या तिघांनाही मदत व्हावी, यासाठी तंत्रज्ञानाची मतदान घेतली जात आहे. कोणताही मतदार देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून त्याच्या एपिक क्रमाकांद्वारे मतदान केंद्र कुठे आहे? याची माहिती मिळवू शकतो. जर मतदाराला त्याच्या मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळवायची असेल तर मतदारांना Know Your Candidate (KYC-ECI) या ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ॲपवर संबंधित उमेदवाराची हरऐक माहिती मिळेल. त्यांच्यावर किती आणि कोणते गुन्हे दाखल आहेत? उमेदवाराची संपत्ती किती आहे? ही सर्व माहिती ॲपद्वारे मिळेल.

मुख्य आयुक्त राजीव कुमार पुढे म्हणाले की, ज्या उमेदवारावर गुन्हे दाखल असतील त्यांना वर्तमानपत्रात तीनवेळा जाहीरात द्यावी लागणार, टीव्हीवरदेखील गुन्ह्यांची माहिती द्यावी लागेल. तसेच राजकीय पक्षालाही असा उमेदवार का दिला? याचे उत्तर द्यावे लागेल.

तसेच cVIGIL ॲपचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही अफरातफर दिसून आली तर या ॲपवर जाऊन त्याची माहिती द्यायची आहे. फोटो अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली. त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोगा सदर परिसराचा माग काढेल आणि १०० मिनिटांच्या आत आयोगाचे पथक त्याठिकाणी दाखल होईल.