“ती” भेट भविष्यात वेगळं काहीतरी देऊन जाईल – अमोल मिटकरी

0
260

मुंबई,दि.०५(पीसीबी) – राष्ट्रवादीचे शरद पवार सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं, तरी यातून निरनिराळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. “शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. त्यांनी माझ्याशी संवाद साधला. उद्या ते शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिराला जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा रुग्णालयात येऊन काही टेस्ट करतील. नंतर त्यांना डिस्चार्ज मिळेल असं त्यांनीच मला सांगितलं”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी पवारांच्या भेटीनंतर दिली.

दरम्यान, या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असून अमोल मिटकरींची प्रतिक्रिया त्यात भर घालणारी ठरली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांना भेटायला गेले. तिथून आल्यानंतर त्यांनी स्वत: सांगितलं की शरद पवारांची प्रकृती चांगली आहे. ही माहिती दस्तुरखुद्द एकनाथ शिंदेंनीच दिली. कालची भेट भविष्यात वेगळं काहीतरी देऊन जाईल, याबाबत कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही”, असं मिटकरींनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.

चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा!
एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी काँग्रेस आमदारांविषयी गंभीर दावा केला आहे. “देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवून घेतील”, असं खैरे म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावरून आता राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.