श्रीनगर, दि. ४ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत. येथील हिंदूंना दहशतवादी सातत्यानं लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर गुरुवारी अनेक हिंदू आणि काश्मिरी पंडितांनी काश्मीर सोडलंय. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल 1 हजार 800 पंडितांसह 3 हजारहून अधिक हिंदूंनी काश्मीर सोडल्याचं वृत्त समोर आलंय. त्यामुळं काश्मिरातील हिंदू वस्त्या पुन्हा ओस पडू लागल्या आहेत.
गेल्या 3 दिवसांत 3 हिंदूंना ठार मारण्यात आलंय. यावर्षी खोऱ्यात आतापर्यंत 26 टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. एकामागून एक या घटनांनी 90 च्या दशकातील भयानक आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. दरम्यान, खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचं पलायन पुन्हा एकदा सुरू झालंय. गेल्या 20 दिवसांपासून तीव्र निदर्शनं काश्मिरात टार्गेट किलिंग विरोधात कऱण्यात आली होती. सरकारकडंही मदतीची याचना करण्यात आली होती. हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर बँक मॅनेजरच्या हत्येनं संपूर्ण काश्मिरातील हिंदू धास्तावल्याचं चित्र दिसून आलंय. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तीव्र खदखद मांडली जात असताना केंद्री सरकारनं नेमकं काय प्रयत्न केलं? असा सवालही उपस्थित होतोय.