तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू

0
139

काळेवाडी, चिंचवड आणि पिंपरी येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुरुवारी (दि. 16) वाकड आणि पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

काळेवाडी येथे पांडुरंग मोतीराम जाधव (वय 68, रा. विजयनगर, काळेवाडी) यांचा मृत्यू झाला. ते काळेवाडी येथे रस्ता ओलांडत असताना त्यांना भरधाव दुचाकी (एमएच 13/बीजे 3371)ने धडक दिली. याप्रकरणी ऋषिकेश पांडुरंग जाधव (वय 19) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड येथे योगेश श्रीकांत संगनोर (वय 27) याचा मृत्यू झाला आहे. चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलाखाली सायन्स पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर योगेश यांच्या दुचाकीला एका डंपरने धडक दिली. त्याखाली चिरडून योगेश यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमेश रमेश मुंडकर (वय 25, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालक दशरथ रमेश धोरलेकर (वय 40, रा. थेरगाव) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महंमद मिराज अब्दुल गफार खान (वय 28, रा. तळवडे) याचा पिंपरी भाजी मार्केट वरील ओव्हर ब्रिजवर मृत्यू झाला. खान याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव चालवून एका दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने खान याचा मृत्यू झाला.