तीन लाखांची लाच घेऊन ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

0
128

पुणे हिट अँड रन प्रकरणात आता दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत असताना अल्पवयीन आरोपीचा ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आल्याचा मोठा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी आता तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे. ससून रुग्णालयाचे फॉरेन्सिक लॅब प्रमुख अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्या सांगण्यावरुन डॉक्टरांनी आरोपीच्या ब्लडमध्ये फेरफार केल्याची माहिती आता उघड झाली आहे. डॉक्टरांनी आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकलं आणि दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेत पोलिसांना पाठवलं. हेच ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं कोर्टात सादर करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचं उघड झालंय. या दोघांना पोलिसांनी आज अटक केली. यासोबतच आरोपी अतुल घटकांबळे या आरोपीलाही अटक करण्यात आली. त्याच्यावर पैशांची मध्यस्थी केल्याचा आरोप आहे. या तीनही आरोपींना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ससूनमध्ये 19 मे या तारखेला सकाळी 11 वाजता अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं. आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क केला. डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हळनोर यांनी ब्ल सॅम्पल बदललं. दुसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवलं गेलं. अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केलं नसल्याचा रिपोर्ट ससूनच्या डॉक्टरांनी दिला.

पोलिसांनी दुसऱ्या सरकारी रुग्णालयात डीएनए चाचणीसाठी अल्पवयीन आरोपीचे दुसरे ब्लड सॅम्पल घेतले. दुसऱ्यांदा घेतलेलं ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपी आणि वडिलांच्या ब्लड सॅम्पलशी मॅच झाले. पण ससूनमधील ब्लड सॅम्पल आरोपीच्या ब्लड सॅम्पलशी मॅच झालं नाही. पोलिसांच्या चौकशीत डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलल्याचं कबुल केलं. 3 लाखांची लाच घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले गेले, अशी माहिती समोर आली.

तीनही आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आज पुणे सेशन कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी पोलीस आणि आरोपींच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. “ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल चेंज करण्यात आले. आरोपी अजय तावरे याच्या सांगण्यावरून हरणोळ याने ते ब्लड सॅम्पल चेंज केले आहेत. आरोपी अतुल घटकांबळे याने पैशांची मध्यस्थी केलेली आहे. याच प्रकरणात विशाल अग्रवाल जे अल्पवयीन आरोपीचे वडील अहेत त्यांचाही आम्हाला ताबा हवा आहे. या सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे”, असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला.

“या सर्व प्रकरणात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. हरणोळ हे सिएमओ म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करतात. अजय तवारे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत. आरोपी अतुल घटकांबळे पोस्टमॉर्टम डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. आम्हाला मोबाइल जप्त करायचे आहेत. तसेच जे पैशांचे व्यवहार झाले आहेत तेही आम्हाला हस्तगत करायचे आहेत”, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.

“आम्हाला ससूनमध्ये अल्पवयीन आरोपीच्या मेडिकलवेळी कोण कोण रुग्णालयात उपस्थित होते त्याचीही माहिती घ्यायची आहे. आणखी कोणाच्या सांगण्यावरून ब्लड सँपल बदलले तेही तपासायचे आहेत. आम्हाला यासाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडी हवी आहे. आरोपींची १० दिवस पोलीस कोठडी हवी आहे”, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.

ससून रुग्णालयातल्या ललित पाटील केसचा संदर्भ तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिला. ससूनमध्ये ललित पाटील प्रकरणात काही डॉक्टरांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळे या हिट अँड रन प्रकरणात आम्हाला सखोल तपास करायचा असल्याचे तपास अधिकारी यांनी कोर्टात सांगितले.