तीन प्रमुख सहकारी बँकांवर रिझर्व बँकेची कारवाई

0
19

दि . ११ ( पीसीबी ) – महाराष्ट्रातील तीन प्रमुख सहकारी बँकांवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये सोलापूर, नागपूर आणि परळी वैजनाथ येथील सहकारी बँकांचा समावेश आहे. या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र आरबीआयने स्पष्ट केलं आहे की, या कारवाईचा ग्राहकांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही.

विशेष म्हणजे, भवानी सहकारी बँकेवर देखील कठोर निर्बंध लावण्यात आले असून पुढील सहा महिने खातेधारकांना त्यांचं पैसे काढणं शक्य होणार नाही. दुसरीकडे, तीन बँकांवर लाखो रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये नागपूर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील बँकांचा समावेश आहे.

आरबीआयने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (नागपूर), सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड आणि महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (परळी वैजनाथ) या बँकांवर कारवाई केली आहे. यामध्ये सोलापूर जनता बँकेला 15 लाख, नागपूरच्या बँकेला 1.5 लाख आणि परळी वैजनाथ येथील बँकेला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट, लोन अ‍ॅडव्हान्सेसचे नियम आणि इतर निर्देशांचे उल्लंघन ही मुख्य कारणं ठरली आहेत.