तीन पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त

0
1071

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक करत तीन पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई चाकण येथील आंबेठाण चौकात करण्यात आली. याप्रकरणी राहुल शहादेव माने आणि तुषार बाबासाहेब मस्के या दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राहुल शहादेव माने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या आणि बलात्कारासारखा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणच्या आंबेठाण चौकात राहुल माने हा पिस्तुलासह थांबला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी निशांत काळे, विजय नलगे, सुधीर डोळस यांना बातमीदारामार्फत मिळाली. खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी गेले, राहुल मानेला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. पोलीस चौकशी दरम्यान त्याचा साथीदार तुषार बाबासाहेब मस्के याचं नाव पुढे आलं. त्याला देखील ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

राहुल शहादेव माने हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बलात्कार आणि खून असे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, रमेश गायकवाड, निशांत काळे विजय नलगे, ज्ञानेश्वर कुराडे, सुधीर डोळस, सुनील कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, चंद्रकांत जाधव, शैलेश मगर, सुधीर डोळस, प्रदीप गट्टे, भरत गाडे, नागेश माळी, यांच्या पथकाने केली आहे.