तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक

0
110

हिंजवडी, दि. 23 (प्रतिनिधी)

आयटी पार्क हिंजवडी नजीक असलेल्या सूसरोडवर असलेल्या एका हॉटेल मध्ये तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सहा जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 23) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींकडून एकूण साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रवींद्र गुंड्या राठोड (वय 40, रा. धानोरी, पुणे), कुमार बापू खळदकर (वय 39, रा. सुतारवाडी, पुणे), सत्यम केमिया राठोड (वय 38, रा. नऱ्हे, पुणे), रुकेश लोक्या मेघावत (वय 43, रा. नांदे चौक, नांदे, पुणे), लोकेश वालिया मेघावत (रा. सुसगाव, ता. मुळशी), चंदू भवसान खेतावत (रा. नांदे चौक, नांदे, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार राजाराम सराटे यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूसरोडवर असलेल्या वेस्टर्न हॉटेल अँड लॉजिंग या हॉटेलमध्ये तीन पत्ती जुगार सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रोख रकमेसह महागडे मोबाईल फोन देखील आहेत. लाखो रुपयांची रोकड घेऊन हे आरोपी जुगार खेळण्यासाठी हॉटेलमध्ये आले होते. मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास जुगाराचा डाव रंगलेला असताना पोलिसांनी कारवाई करून सहा जणांना अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

कारवाई झाल्यानंतरही आरोपींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य

आपण जुगार खेळताना पकडले गेलो आहोत. आपल्यावर कायदेशीर कारवाई होत आहे. याचा आरोपींना काहीही ताण नसल्याचे या कारवाईमध्ये आढळून आले. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक आरोपी चक्क कॅमेऱ्याकडे पाहून स्मितहास्य करत आहे. त्याला दुसरा आरोपी साथ देत असल्याचे व्हायरल झालेल्या फोटो मध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे याच फोटो मध्ये चार पोलीस अंमलदार देखील दिसत आहेत.