तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0
293

 जम्मू , दि.३० (पीसीबी) – : जम्मू-काश्मीरमधील शोपियान आणि बारामुल्ला येथे रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियान जिल्ह्यातील चित्रगाममध्ये सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.

प्रत्यक्षात सुरक्षा दलांना रात्री उशिरा माहिती मिळाली होती की चित्रगाममध्ये काही दहशतवादी जमा झाले आहेत. यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. दुसरीकडे, बारामुल्लामध्येही चकमक सुरू आहे. बारामुल्ला येथील विद्दीपोरा पाटण भागात सुरू असलेल्या या चकमकीत दोन दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. यापूर्वी मंगळवार आणि सोमवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील अहवातु गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराव घालण्यास सुरुवात केली.

यादरम्यान, नाकाबंदी होताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलांनी संधी दिली नाही. अनेकवेळा आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करूनही त्यांनी ऐकले नाही आणि सुरक्षा दलांवर गोळीबार सुरूच ठेवला. यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. सुमारे चार तास चाललेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.