बीड, दि. २8 (पीसीबी)
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या मर्डर प्रकरणातील तीन आरोपींचा खून झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. बीडमधील राजकीय गुन्हेगारीचा आणि गुंडशाहीचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. तर याप्रकरणात पोलीस यंत्रणा आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी विराट मोर्चा थोड्याच वेळात निघत आहे. त्यापूर्वीच अंजली दमानिया यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणात आतापर्यंत चार आरोपी अटकेत आहेत. तर वाल्मिक कराड यांना खंडणीप्रकरणात अटक होत नसल्याने रोष व्यक्त होत आहे. त्यातच उर्वरीत तीन आरोपी अजूनही का पकडले जात नाहीत, यावरून राज्यात संतापाचे वातावरण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
‘काल रात्री मला ११.३० वाजेच्या दरम्यान फोन आला. मला व्हॉट्सअप कॉलवर या सांगितलं. फोन लागला नाही. त्यांनी मला व्हॉइस मेल पाठवलं. त्याने सांगितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील लोक कधीच भेटणार नाही. ते मेले. तीन प्रेते सापडली. ती जागाही कॉलवाल्याने सांगितली. हे खरं खोटं मला माहीत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींची मर्डर झाला आहे.’ अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.
सात पैकी तिघांची हत्या झाल्याचं कॉल करणाऱ्यांनी सांगितले. हे खरे आहे की खोटे आहे.. मला काही माहीत नाही. आता आपल्याला त्या कुटुंबासोबत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे आम्ही बीडला जात आहोत. धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडले पाहिजे, वाल्मीक कराड सारखे माणसे त्यांच्यामागे उभे आहेत, असे दमानिया म्हणाल्या.
आपण आज बीडमधून निघणाऱ्या मोर्चात सहभागी होणार नाही कारण सर्व राजकारणी मंडळी त्या मोर्चा मध्ये आहेत, असे दमानिया म्हणाल्या. बीडला जाऊन मी कलेक्टर ऑफिस समोर ठिय्या आंदोलन करणार आहे, असे त्या म्हणाल्या. गृहमंत्री नेहमीच डायलॉग बाजी करतात. अनेक प्रकरणात एसआयटी चौकशा लावल्या, परंतु त्यांचे काय झाले असा सवाल त्यांनी केला. धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्यामुळे वाल्मीक कराड सापडणार नाही, असे त्या म्हणाल्या.