तीन अपघातांमध्ये एकाचा मृत्यू, दोघे जखमी

0
305

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी आणि देहूरोड परिसरात अपघाताच्या तीन घटना घडल्या. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. 20) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

नितीन गौतम गवळी (वय 33, रा. काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचा मोठा भाऊ सचिन गौतम गवळी (वय 39) हे 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता डिलक्स चौक येथे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी बाळू श्रीपती सावंत (वय 45, रा. गांधीनगर, पिंपरी) हा त्याच्या ताब्यातील क्रेन घेऊन डिलक्स चौकातून काळेवाडीच्या दिशेने जात होता. आरोपी क्रेनने सचिन गवळी यांना पाठीमागून धडक दिल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला.

मंगलदास तुकाराम हांडे (वय 27, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे दाजी अनिल महादेव बंडगर (वय 28, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) सम्राट चौकाकडून फिनोलेक्स चौकाकडे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी एका कार चालकाने त्याच्या कारने बंडगर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यांनतर कार चालक पळून गेला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

संजय जितलाल यादव (वय 25, रा. ताथवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ अजय जितलाल यादव (वय 38) यांच्या दुचाकीला शुक्रवारी (दि. 19) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास कारने धडक दिली. त्यात अजय यादव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. याबाबत अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.