तिसऱ्या, चौथ्या ट्रॅकसाठी राज्य सरकारचा निधी द्या

0
4

खासदार श्रीरंग बारणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दि . ९ ( पीसीबी ) – पिंपरी – पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकच्या कामाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी राज्य सरकारची ५० टक्के हिश्याची रक्कम तातडीने द्यावी. त्यामुळे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा होईल. निधी तत्काळ देण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

याबाबत खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना तिस-या आणि चौथ्या ट्रॅकची सविस्तर माहिती दिली. त्यासाठीचा राज्य सरकारचा हिस्सा तातडीने देण्याची मागणी केली. खासदार बारणे म्हणाले, गेल्या तीन दशकांपासून पुणे, लोणावळा दरम्यान तिसरा व चौथा ट्रॅक व्हावा यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची मागणी आहे. २०१४ मध्ये मी निवडून आल्यानंतर त्यासाठी पाठपुरावा सुरु केला. केंद्र सरकारने २०१५-१६ मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा केली. त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये रेल्वे बोर्डाने महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. त्यासाठी २०१७ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील केली. याचा ५० टक्के खर्च केंद्रीय रेल्वे विभाग आणि ५० टक्के राज्य सरकार अशी खर्चाची विभागणी आहे. राज्याच्या ५० टक्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहभाग राहणार आहे. अनेक वर्ष हा प्रकल्प रखडला आहे. राज्य सरकारने आपल्या हिश्याचा निधी न दिल्यामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे. नागरिकाची सोय व लोकल सेवा सुरळीत होण्यासाठी हे ट्रॅक होणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे पुणे – लोणावळा तिसऱ्या व चौथ्या ट्रँक साठी राज्य सरकारच्या हिश्याचा निधी तत्काळी मिळावा.

तिसरा, चौथा ट्रॅक करण्यासाठी रेल्वेमंत्री अष्विनी वैष्णव हे सहकार्य करित आहेत. मागील आठवड्यात पुणे दौ-याव आले असता त्यांनी या कामाला तत्काळ सुरुवात करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही निधी देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हिस्सा मिळून लवकरच कामाला सुरुवात होईल अशी आशा असल्याचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.