पिंपरी, दि .8 (पीसीबी)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना तिसरे अपत्य जन्माला घातल्यामुळे नोकरी गमवावी लागली आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही कारवाई केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 1 जुलै 2005 च्या परिपत्रकानुसार 28 मार्च 2006 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असल्यास संबंधित उमेदवाराचा नेमणुकी करीता विचार केला जाणार नाही. शंभर रूपयाच्या स्टॅम्पवर नोटराईज केलेले अपत्याबाबतचे प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. मात्र, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी रूजू होताना तसे प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हते. त्यांच्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती.
त्या चौकशीमध्ये दांगट यांना तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याने श्रीनिवास दांगट यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळून आले आहेत.
महापालिका सर्वसाधारण सभेच्या अधिकाराच्या अंतर्गत श्रीनिवास दांगट यांना महापालिका सेवेतून कमी करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. तसे आदेश आयुक्त सिंह यांनी मंगळवारी काढले आहेत.