आहारशास्त्रानुसार तिळगूळ फक्त संक्रांतीच्या दिवशी खायला पाहिजे असे आहे का? याचा विचार आपण कधी केलाच नाही.प्रत्यक्षात असे नाही,आपला प्रत्येक सण, प्रथा, रूढी, परंपरा यामागे शास्त्रीय कारण दडलेले असते. आपण ते समजून शास्त्रीय पद्धतीने सण साजरा केला पाहिजे. म्हणजे, त्या सणाचे खरे सार्थक होईल आणि त्याचा फायदाही आपल्या आरोग्यासाठी होईल.
नवीन वर्षाची सुरुवात आपण उत्साह आणि आनंदानं करतो. त्या नंतर अवघ्या १५ दिवसांनी येणारी मकरसंक्रांत सर्वांचाच आनंद द्विगुणित करते. तिळगुळाचा गोडवा, त्यातला स्निग्धपणा प्रत्येकाच्या स्वभावात असावा आणि त्यातून प्रेमाची नाती जोडली जावीत, अशी त्या मागची भावना असते; याबाबत अनेक प्रश्न पडलेले असतात त्याचे निरसन करू या.
तिळगूळ कोणत्या महिन्यापासून खायला सुरू करावा?
तिळगूळ हे उष्ण व स्निग्ध असल्याने थंडीच्या दिवसांत खावे खरे; परंतु आज काल ऋतुचर्या बदलायला लागली आहे. थंडी लवकर किंवा उशिरा पडते. पाऊस उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही पडतो; त्यामुळे ज्या वर्षी हिवाळा लवकर सुरू होईल, त्या वर्षी डिसेंबरच्या शेवटापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हिवाळा असेल, तर आपण तिळगूळ खाऊ शकतो.
मधुमेहींनी तिळगूळ खाल्ला, तर चालेल का?
तीळ आणि गूळ या दोन पदार्थापैकी मधुमेह असलेला व्यक्ती तीळ खाऊ शकतात; परंतु त्यातही वजन, शरीरातील चरबी, व्यायाम, दिनचर्या याचा विचार करून त्याचे प्रमाण ठरवावे. गूळ हा उसाच्या रसापासून बनवतात आणि साखरही,मधुमेह असलेल्या रुग्णाला उसाचा रस चालत नाही, तर त्यापासून बनवलेले पदार्थ कसे चालतील? त्यामुळे गूळ मधुमेहींना चालत नाही. संक्रातीच्या एका दिवशी थोड्या फार प्रमाणात थोडासा तिळगूळ चालेल; परंतु औषधांचे डोस आणि इन्सुलिनप्रमाणे प्रमाणात खावा.
वजन कमी करायचे असल्यास तिळगूळ चालेल ?
अर्थात चालेल; परंतु तिळगूळ खाऊन व्यायाम करावा लागेल. आजकाल बाजारामध्ये एनर्जी, प्रोटीन बार बघायला मिळतात. यांची किंमत सामान्यांच्या खिशाला रोज खाण्यासाठी न परवडणारी असते; त्यामुळे आपण रूढी परंपरागत खात आलेला पदार्थ म्हणजे तिळगूळ ‘एनर्जी बार’ म्हणून वापरू शकतो. तिळगुळाची चिक्की किंवा लाडू व्यायामाच्या आधी खाऊ शकतो. व्यायामाची तीव्रता, काळ, प्रकार हे बघून त्याचे आहारातले प्रमाण ठरवावे. व्यायाम कमी आणि तिळगूळ जास्त झाले, तर वजन कमी होण्याऐवजी वाढेल.
लहान मुलांना आणि वृद्धांना चालेल का ?
या दोघांमध्ये एका गोष्टीचे साम्य आहे, ती म्हणजे हाडामधील कॅल्शिअम. या वयात हाडांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण कमी असल्याने त्याची गरज जास्त असते आणि तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम असते. त्यामुळे लहान मुलांना आणि वृद्धांना तिळगूळ आवर्जून द्यावेत. वृद्धापकाळात वात कमी करण्यासाठी स्निग्ध पदार्थ खाणे महत्त्वाचे असते. तीळ हे स्निग्ध असतात. ते वात कमी करण्यासाठी मदत करतात.
रोज तीळ चावून खाल्ल्यास शरीराचे बल वाढते आणि दातही मजबूत होतात. सांधेदुखीसाठी तिळाचे तेल गरम करावे आणि त्याने कंबर, सांधे सर्वांना अभ्यंग (मालिश) केल्यास दुखणे कमी होईल. तीळ हे मातेचे दूध वाढवितात; म्हणून बाळंतिणीला तिळाचा लाडू, भाजलेले तीळ देण्याची प्रथा आहे. बाळंतशेपा, ओवा, भाजलेले तीळ, सैंधव, बडीशेप एकत्र करून बाळंतिणीला दिल्यास वाताच्या तक्रारी, गॅस, पचन न होणे या सर्वांस आराम मिळतो. मूळव्याधीच्या त्रासात रक्त पडत असल्यास लोणी-खडीसाखर, नागकेशर यांच्यासमवेत तीळ सेवन केल्यास चांगला परिणाम होतो. लहान मुलांना अपचन होऊन पोट दुखते. अशा वेळी बेंबीच्या भोवती गोलाकार पद्धतीने तिळाचे तेल चोळावे आणि गरम तव्यावर कापड गरम करून शेकावे. दुखणे लवकर कमी होते. पुढील लेखात तिळाप्रमाणे गुळाच्या उपयोगाची माहिती घेऊयात.
https://chat.whatsapp.com/FdqVO6Vmfr1EelPN0j5tfd
।।हर घर आयुर्वेद।।
।।हर दिन आयुर्वेद।।
आरोग्य तज्ज्ञ
वैद्य.अविनाश देवरे(एम.डी. आयु)
वैद्या. विद्या देवरे (एम.डी. आयु)











































