तानाजी सावंत वेगळा निर्णय घेणार, धनुष्यबाणाचे चिन्ह हटवलं

0
65

– शिवसेना पदाधिकारी सामूहिक राजीनाम देणार ?

परांडा, दि. 17 (पीसीबी) : 23 नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मागच्या रविवारी 15 डिसेंबरला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्र्यांच्या शपथविधीनंतर तिन्ही पक्षात नाराजी नाट्य सुरू झालं आहे. अशात शिवसेना गटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेंशन वाढवणारी माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या नाराजीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात डावलल्याने त्यांचे समर्थक कमालीचे संतापले आहेत. आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

इतकंच नाही तर, या प्रकरणी परंडा येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत तानाजी सावंत यांना मंत्री करा, म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न दिल्यास दोन दिवसात परंडा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा देखील देण्यात आलाय.

नुकत्याच झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या या बैठकीत परंडा तालुक्यातील 25 सरपंच उपस्थित होते. यात तानाजी सावंत यांना मंत्री करा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. यामुळे एकनाथ शिंदे यांची चिंता वाढली आहे. तानाजी सावंत देखील आजाराचे कारण देत अधिवेशन सोडून तडकाफडकी पुण्याला निघून गेले आहेत.

यातच त्यांनी सोशल मीडियावर देखील नाराज असल्याचं दाखवून दिलंय. आमदार तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुक व इतर समाज माध्यमावरील धनुष्यबाणाचे चिन्ह हटवलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला मी शिवसैनिक असं स्टेटस ठेवून त्यांनी उघड नाराजी जाहीर केली आहे.