ताथवडे सिलिंडर स्फोट प्रकरण – दोन पोलीस अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

0
253

ताथवडे,दि.१०(पीसीबी) – बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करत असताना ताथवडे येथे रविवारी रात्री मोठा स्फोट झाला. या प्रकरणी दोन पोलीस अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक परवेझ शिकलगार, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सोमवारी रात्री उशिरा देण्यात आले आहेत.

रविवारी रात्री ताथवडे येथील जेएसपीएम संस्थेच्या ब्लॉसम इंग्लिश स्कूल जवळ मोकळ्या मैदानात प्रोपीलीन गॅस भरलेल्या कॅप्सूल (टँकर) मधून बेकायदेशीरपणे गॅस चोरी करत असताना आगीची दुर्घटना घडली. यामध्ये तब्बल नऊ सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर घटनास्थळी एकूण 27 सिलेंडर तसेच टँकर मधून गॅस काढून सिलेंडर मध्ये भरण्यासाठी वापरली जाणारी साधने आढळून आली. घटना घडल्यानंतर संबंधितांनी घटनास्थळावरून पोबारा केला.

दरम्यान, या घटनेची राज्यभर चर्चा झाली. खुद्द आरोग्यमंतत्री तानाजी सावंत यांची जेएसपीएम संस्था असल्याने सोमवारी सकाळी त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या घटनेसाठी जबाबदार पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.