ताथवडे येथील नवीन अतिउच्चदाब उपकेंद्राला महावितरणची मंजूरी; ८५ हजार वीजग्राहकांना लाभ

0
231

पुणे, दि. ०७ फेब्रुवारी २०२४: विजेची वाढती मागणी तसेच दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ताथवडे येथील ‘यशदा’च्या जागेवर प्रस्तावित अतिउच्चदाबाचे २२०/२० केव्ही उपकेंद्र उभारण्यास महावितरणकडून नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे. त्याचा फायदा ताथवडे, पुनावळे, चिंचवड, किवळे, वाकड व हिंजवडी परिसरातील सुमारे ८५ हजार वीजग्राहकांना होणार आहे. अतिउच्चदाबाचे हे नवीन उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही महापारेषणकडून करण्यात येणार आहे.

पुणे परिमंडलातील भविष्यातील वीजपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता महावितरणकडून आतापर्यंत चऱ्होली येथील २२०/३३/२२ केव्ही प्राईड वर्ल्ड सिटी, मोशी येथील २२०/२२ केव्ही सफारी पार्क हे दोन नवीन अतिउच्च्दाब उपकेंद्र उभारण्यास तसेच सेन्चुरी एन्का उपकेंद्राची १०० एमव्हीएने क्षमतावाढ करण्यास मंजूरी मिळाली आहे. आता ताथवडे येथील तिसरे अतिउच्चदाब उपकेंद्र देखील मंजूर झाले आहे.

महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत हिंजवडी, ताथवडे पुनावळे, किवळे, वाकड व चिंचवड तसेच भोसरी विभागातील रावेत व आकुर्डी परिसरातील सुमारे २ लाख २९ हजार ७०० वीजग्राहकांना महापारेषणच्या २२०/२२ केव्ही चिंचवड व २२०/२२ केव्ही हिंजवडी अतिउच्चदाब उपकेद्रांद्वारे वीजपुरवठा केला जातो. या परिसरात दिवसेंदिवस विजेची व नवीन वीजजोडण्यांची वाढती मागणी तसेच सद्यस्थितीत असलेल्या चिंचवड व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रावरील भार कमी करण्यासाठी महावितरणकडून ताथवडे येथे २२०/२२ केव्ही क्षमतेचे अतिउच्चदाबाचे नवीन उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले. त्यास महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंजूरी दिली आहे. हे उपकेंद्र उभारणीची पुढील कार्यवाही महापारेषणकडून होणार आहे. विशेष म्हणजे या उपकेंद्रासाठी ‘यशदा’ने ताथवडे येथील चार एकर जागा देण्याचे मान्य केले आहे.

ताथवडे येथील अतिउच्चदाबाच्या नवीन २२०/२२ केव्ही यशदा उपकेंद्रातून २२ केव्ही क्षमतेच्या १० नवीन वीजवाहिन्या निघतील तर ५० एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यात येतील. या १० वीजवाहिन्यांद्वारे ताथवडे, पुनावळे, चिंचवड, किवळे, वाकड व हिंजवडी परिसरातील सुमारे ८५ हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येईल. तसेच हिंजवडी व चिंचवड अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रावरील वीजभार कमी होणार असल्याने एकूण सुमारे २ लाख २९ हजार ७०० वीजग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होईल. काही कारणांमुळे वीज खंडित झाल्यास सक्षम पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल- ‘पुणे परिमंडलामध्ये नागरीकरण मोठ्या वेगाने होत आहे. मागील वर्षी विक्रमी २ लाख ३४ हजार नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. विजेची मागणी देखील वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील वीज पुरवठ्याच्या स्थितीचा वेध घेऊन पायाभूत वीजयंत्रणेचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये प्रस्तावित केलेल्या ताथवडे येथील अतिउच्चदाबाचे नवीन उपकेंद्र उभारण्यास मंजूरी मिळाली आहे.’