- खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट
पिंपरी, दि . ८ ( पीसीबी ) : पिंपरी-चिंचवड शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या ताथवडेतील पशुसंवर्धन केंद्राच्या ६५ हेक्टर जागेत सेंट्रल पार्क उद्यान विकसित करावे. ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, ताथवडे परिसर पिंपरी-चिंचवड शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे पशुसंवर्धन विभागाची ६५ हेक्टर जागा आहे. ही जागा ब्रिटिश काळापासून आरक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. चारही बाजूंनी शहराचा विस्तार होत आहे. मोठं मोठ्या गृहनिर्माण संस्था उभारत आहेत. टोलेजंग इमारती होत आहेत. सिमेंटचे जंगल वाढत आहे. त्यामुळे मोठ्या उद्यानाची आवश्यकता आहे.
ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या ६५ हेक्टर जागेवर सेंट्रल पार्क उद्यान होणे गरजेचे आहे. उद्यान झाल्यास झाडेही वाचतील. बाजूनेच शहरातून वाहणारी पवना नदी जात आहे. नदी लगत या परिसरात निळी पुररेषा आहे. नदी लगतच्या जागेत सेंट्रल पार्क उद्यान विकसित केले. तर, त्याचा नागरिकांना लाभ होईल. नागरिकांना शुद्ध हवा मिळेल. बाजूलाच थेरगाव येथे बोट क्लब आहे. त्यामुळे शहरातील नागरिक येथे सकाळ, संध्याकाळी जॉगिंग, वाकिंगसाठी येथील. जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी हक्काचे ठिकाण होईल.
अन्य देशात सेंट्रल पार्क उद्यान विकसित केले जाते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील नागरिक तिथे जातात. त्याचप्रमाणे शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या ताथवडेतही सेंट्रल पार्क उद्यान विकसित करावे. कोणत्याही विभागासाठी ही जागा देऊ नये, ही जागा महापालिकेला हस्तांतरित करावी. जेणेकरून महापालिका या जागेवर सेंट्रल पार्क उद्यान विकसित करेल. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल. नागरिकांना हक्काचे मोठे उद्यान मिळेल. संपूर्ण शहरातील नागरिक उद्यानात येथील. सकाळी, सध्याकाळी जॉगिंग, वाकिंगसाठी हक्काचे ठिकाण मिळेल, असेही खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.