तांबडे फुटल नाही तोच दादा बांधावर…

0
54

दि. २३ जुलै (पीसीबी) – तांबड फुटलेल आणि त्याचवेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काटेवाडीच्या सुनील सिताराम काटे यांच्या बांधावर होते.रात्री उशिरा त्यांना सुनीलची केळीची बाग मुसळधार पावसाने कोसळली आहे असं समजलेले.कोंबडा ओरडायला दादा त्याच्या बांधावर दादा आलेले..अगोदर दादा आणि मग अधिकारी आले.लोकांच्या अडचणीत कस धावून जायचं, वेळ काळ प्रोटोकॉल न बघता लोकांच्या संकटसमयी राज्यकर्त्यांनी गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन दादा कसे काम करतात हे मी स्वतः शेकडो वेळा पाहिलं आहे. त्यामधील हे एक उदाहरणं..

अजितदादा पवार सतत कामात व्यस्त असणारा माणूस मीडिया दादांच्या या गोष्टींच्या नेहमी बातम्या करतो.दादांच्या कामाची स्टाईल,त्यांची निर्णय घेण्याची क्षमता,कामाची धडाडी यांची नेहमी चर्चा होते.दादांचे मित्र आणि दादांचे टीकाकार दादांच्या धडाडीची स्तुती करतात.मी गेली दोन दशक दादांच्यासोबत काम करतोय. दादांचा राजकीय पिंड मला जवळून बघता आलाय.पण दादांचा कुटूंबवत्सल स्वभाव त्याहून मला जवळून बघता आलाय.उपमुख्यमंत्री असणाऱ्या दादांची कुटूंबवत्सलता मला खूप भावली आहे.कुटूंबासाठी दादा किती संवेदनशील आहेत याचे अनेक अनुभव त्यांचा पीए म्हणून मला सांगता येतील.पण दादांचे कुटुंब हे खूप व्याप्त आहे.दादांच्या कुटूंबात दादांच्या घरातील सर्व नोकर,त्यांची मुले, त्यांचे नातेवाईक असतात.दादा कितीही व्यस्त असले तरी ते आपला कुटुंबवत्सल स्वभाव सोडत नाहीत.त्यांचे वात्सल्य तेच राहते.

अजितदादा म्हणजे कष्ट. अतोनात कष्ट..एक पत्रकार गमतीने म्हणाले होते,’रात्र होतेय म्हणूनच हा माणूस झोपत असावा,नाहीतर दादांनी झोपही घेतली नसती..’काटेवाडीचा डॉ. सोमनाथ हनु माने सांगतो, आम्ही सन 2015 रोजी साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्राची स्थापना करून महाराष्ट्र मध्ये देशी गाईंचे दूध उत्पादन वाढण्यासाठी देशातील प्रसिद्ध असलेल्या सहिवाल गाय संवर्धन क्लब शेतकऱ्यांच्या माध्यमातून चालू केला. याची दादांनी दखल घेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागामध्ये देशातील पहिले देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र २०२० ला सुरू केले.देशी गाईंची संख्या वाढण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण या तंत्रज्ञानाचा वापर करून दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या सहिवाल, गीर, राठी, लाल सिंधी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील खिल्लार व कोकण कपिला, डांगी, गौळाऊ, लाल कंधारी, देवनी ई देशी गाईंची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बदलत्या वातावरणामध्ये गाईंच्या प्रजनन व दूध उत्पादनावर होणारा परिणाम याचा अभ्यास आता सध्या महाराष्ट्र मध्ये होत आहे तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे सेंद्रिय व नैसर्गिक शेती ही सुद्धा पुढील काळाची गरज असणार आहे ज्या माध्यमातून जमीन सुधारणा होऊन विषमुक्त अन्न तयार होणार आहे यासाठी सुद्धा देशी गाईच्या शेण व गोमूत्र चा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग चालू आहेत. गेली चार वर्षे सुरू असलेल्या संशोधनाची दखल अजितदादा पवार यांनी घेऊन देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स देशी गाय व गो पर्यटन केंद्रासाठी या अधिवेशनामध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. एक ट्रॅक्टर ड्रायव्हर पासून सुरू झालेला प्रवास आता सध्या देशातील एका अत्यंत महत्वाच्या देशी गाय संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून चालू आहे.महाराष्ट्रातील पहिल्या गोसेवा आयोगाचे सदस्य महणून काम करीत आहे,दादांचे माझ्या वडिलांच्यासोबत खूप घनिष्ठ संबंध होते.अगदी गरीब परिस्थितीमध्ये असताना दादा वहिनीनि परिवाराला मार्ग दाखवला.असे डॉ.सोमनाथ सांगतो.

जालिंदर शेंडगे हे अजित दादांच्या लहानपणापासून पवार कुटूंबाच्या सेवेत होते.दादा लहान असताना त्यांना सायकलने शाळेत पोहोचवण्याचे काम शेंडगे करत होते.दादा आमदार झाले, खासदार झाले,राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.त्यांचा तोच जिव्हाळा कायम राहिला.जालिंदर आणि त्यांचा ऋणानुबंध तोच राहिला.अधूनमधून दादा त्यांची चौकशी करीत. दादा वेगवेगळ्या व्यापात आहेत. कामाचा धडाका सुरू आहे. याकाळात दादांना अजिबात वेळ नसतो.त्याचवेळी एका कार्यक्रमात दादांना जालिंदरची बायको भेटते.,”जालिंदर खूप आजारी आहे असं सांगत ती दादांना म्हणते,’दादा, माझं कुकु वाचवा.’तेव्हा दादा हळवे होतात.दादांच्यातील नेत्यांवर कुटुंबप्रमुख विजय मिळवतो. दादा तिथूनच फोनाफोनी सुरू करतात.मला सांगतात “काहीही कर आपला जालिंदर वाचला पाहिजे”.दादा कधी जिव्हाळ्याने तर सक्त ताकीद देत सांगत राहतात.जालिंदर जोवर दवाखान्यात जात नाही तोवर स्वतः पाठपुरावा करत राहतात.जालिंदरवर उपचार सुरू झाल्यावरच दादांच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळतो.पण त्याची तब्बेत बिघडली हे ऐकून पुन्हा तणाव येतो. जालिंदर गेला हे समजताच दादा गहिवरून जातात. चार दिवस त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसते.. कडक दादा पण जालिंदरच्या वेळी मात्र कडक कणखर दादांच्यातील संवेदनशील कुटुंबप्रमुख मित्र सखा सोबती बघितला..

रामभाऊ बळवंड नावाचे दादांचे जुने मित्र. ज्यांनी दादांना भाषण करायला शिकवले होते,त्यांचे आणि दादांचे ऋणानुबंध मला बघायला मिळाले. रामभाऊंच्या कोणत्याही अडचणीत आपण उभे राहायचे असे दादांनी मला बजावलेले होते. रामभाऊ गेल्यावर दादांची अस्वस्थता त्या दोघांतील जिव्हाळा किती अतूट होता हे सांगून गेली. दादा आजही रामभाऊ यांच्या कुटूंबाबाबत खूप हळवे आहेत..

दादांचे वडील तात्यासाहेब हे त्याकाळचे गाजलेले मल्ल. त्यांनी अनेक चांगल्या कुस्त्या केल्या होत्या. दादांच्या हस्ते जेव्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उदघाटन झाले होते, तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांच्या कुस्तीच्या कारकीर्दबद्दल सांगितले होते. ‘एका कुस्तीगिराच्या मुलाला आपण कुस्ती स्पर्धेचे उदघाटन करण्याची संधी दिलीत.’असा उल्लेख त्यांनी केलेला.तात्यासाहेब यांची अजून एक गोष्ट अशी की त्यांनी व्ही शांताराम यांच्यासोबत काही काळ काम केले होते.. आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना दादा भूतकाळात रमतात..

दादा राज्याचे उपमुख्यमंत्री.पण ते जेव्हा शेतात जातात तेव्हा शेजारच्या सुखदेवला अगदी रांगड्या भाषेत हाक मारतात.त्याची आपुलकीने चौकशी करतात.त्याच्याजवळ बसून संवाद करतात. दादांनी रंगवलेले असे गप्पांचे फड जवळून पाहिले आहेत. विधानसभा गॅलरीतील असे गप्पांचा फड मी जवळून पाहिलेत. त्यामध्ये चेष्ठा मस्करी करणारे दादा मला दिसले. त्यांचा विनोदी स्वभाव बघायचा असेल तर दिलीप सोपल यांच्यासारखे त्यांचे सहकारी भेटायला हवेत. मग त्यांच्या गप्पा रंगतात..

स्वच्छता,टापटिप,नीटनेटकेपणा याबाबत दादा खूप दक्ष असतात. वक्तशीरपणा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. तशीच त्यांची ओळख आहे मात्र स्टेटसमन म्हणून काम करताना ज्यास अपंगिता नाही त्यास धरी जो हृदयी तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा.. असं संत तुकाराम महाराज म्हणतात..

दादांच्यासोबत काम करताना मी हे सगळं बघतोय. कणखर दादा बघताना सर्वसामान्य माणसांच्या दुःखाने हळवे होणारे दादाही बघतोय.. दादा नावाचा माणूस, राज्यकर्ता, राज्ययंत्रणा कोणासाठी राबवायची हे माहिती असलेला हा माणूस, म्हणूनच दादांचे कॉल रेकॉर्ड व्हायरल होतात.. फोन करणारा असं काही साधं काम त्यांना सांगतो की जे काम उपमुख्यमंत्री पदावरच्या माणसाचं काम नसते. पण दादा तेही मार्गी लावतात आणि मग त्याची बातमी होते..

दादांना यातील काहीही माहिती नसत.. दादा आपल्या कामात व्यस्त असतात.. अखंड कार्यरत रहातात….त्यांना राजकीय कारकिर्दीसाठी व अखंड कार्यरत राहण्याचे अभीष्टचिंतन करतो.

श्री सुनीलकुमारजी मुसळे

( उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक )