तांत्रिक अडचण दूर, नवीन मालमत्ता धारकांनी कर भरणा करावा

0
56
  • महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाचे आवाहन

दि. 16 जुलै (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड – महापालिकेने नेमलेल्या स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. कंपनीने नव्याने आढळलेल्या मिळकतींना कर आकारणी बिले बजावली आहेत. या बिलाबरोबर दिलेल्या स्कॅन कोडला तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ती आता दुर झाली आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांनी कोड स्कॅन करून आपल्या मालमत्ता कराचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात नवीन, वाढीव अशा मालमत्तांचा अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. शहरात सुमारे दोन लाख नवीन आणि वाढीव मालमत्ता आढळण्याचा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे.

मालमत्ता सर्वेक्षणासाठी महापालिकेने स्थापत्य कन्सल्टंट प्रा. लि. कंपनीची नियुक्ती केली आहे. याच कंपनीच्या मार्फत नव्याने आढळलेल्या सुमारे साडेपाच हजार
मिळकतींना कर आकारणी बिले बजावली आहेत. या बिलाबरोबर मालमत्ता धारकांना तत्काळ कर भरण्यासाठी स्कॅन कोड दिला आहे. मात्र, या स्कॅन कोडला पाच ते सहा दिवसांपासून तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे मालमत्ता धारकांना बिले मिळाली असतानाही आपल्या कराचा भरणा करता येत नव्हता. आज (दि.16) मंगळवारपासून स्कॅन कोडची तांत्रिक अडचण दूर झाली आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांनी बिलावरील कोड स्कॅन करून आपला मालमत्ता कराचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.