तळेगाव हत्याकांडातील माय लेकरांचा शोध थांबवला

0
78

तळेगाव, दि. 26 जुलै (पीसीबी) – प्रियकराने प्रेयसीच्या मृतदेहासह तिच्या दोन चिमुरड्या मुलांना नदीमध्ये फेकून दिले. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 22) तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. दरम्यान, एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षकांच्या एकूण पाच टीमने सलग तीन दिवस माय लेकरांचा शोध घेतला. मात्र, अतिवृष्टीमुळे पण्याची पातळी वाढल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे.

समरीन निसार नेवरेकर (वय 25) आणि ईशांत (वय 5), इजान (वय 2) अशी शोध सुरू असलेल्या माय लेकरांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय 37, रा. समता कॉलनी, वराळे, मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (वय 41, रा. डॉन बॉस्को कॉलनी, ईश्वरानंद सोसायटी, सावेडी, अहमदनगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजेंद्र दगडखैर याने 6 जुलै समरीन नेवरेकर हिला गर्भपात करण्यासाठी मित्र रविकांत गायकवाड याच्यासोबत कळंबोली येथे पाठविले. दरम्यान, रुग्णालयात गर्भपात सुरू असताना समरीन हिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून 9 जुलै रोजी समरीनचा मृतदेह आणि तिच्या दोन्ही लहान मुलांना तळेगाव येथील वराळे येथे आणले. इंद्रायणी नदीत फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन त्यांचा ठरला. त्यानुसार, इंद्रायणी नदीत आरोपींनी समरीनचा मृतदेह फेकला. आईला फेकल्याचे पाहून दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. त्यामुळे नराधम आरोपींनी दोन्ही मुलांना देखील जिवंतपणे नदीत फेकून दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, समरीन हिच्या मृतदेहासह दोन चिमूरड्या मुलांना शोधण्यासाठी एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षकांच्या पाच टीम नदीमध्ये उतरल्या होत्या. सलग तीन दिवस शोधकार्य करूनही टीमला यश मिळाले नाही. बुधवारी (दि. 24) रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे टीमला माय लेकरांचा शोध घेणे कठीण झाले. तसेच, एनडीआरएफच्या जवानांना माघारी बोलवल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे.

तळेगाव एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर म्हणाले, “एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षकांच्या टीमकडून तीन दिवस शोध मोहीम घेण्यात आली. पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शोधकार्य तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे.”